विराट कोहली-अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळला, विराटने सोडले मैदान

टीम इंडियात इंग्लंड दौऱ्यात ठिक नसल्याचे दिसून येत आहे. अंतर्गत वाद उफाळला आहे. कर्णधार विराट कोहली आणि टीमचा प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळलाय. कुंबळे मैदानात दाखल होताच विराटने मैदान सोडले. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 2, 2017, 05:38 PM IST

लंडन : टीम इंडियात इंग्लंड दौऱ्यात ठिक नसल्याचे दिसून येत आहे. अंतर्गत वाद उफाळला आहे. कर्णधार विराट कोहली आणि टीमचा प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद उफाळलाय. कुंबळे मैदानात दाखल होताच विराटने मैदान सोडले. 

इंग्लंडमध्ये चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकण्याच्या हेतूने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. मात्र, कोहली-कुंबळे वादाचा परिणाम होण्याची चर्चा वर्तविण्यात येत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील संघर्ष वाढू लागल्याचं समोर येत आहे. 

विराट कोहली नेट प्रॅक्टिस करत असताना प्रशिक्षक अनिल कुंबळे तिथे पोहोचला आणि विराटने मैदान सोडणे पसंत केले.  कोहलीने काढता पाय घेतल्याने चर्चा सुरु झाली. 

मंगळवारी भारतीय संघ बांग्लादेशविरोधात सराव सामना खेळणार होता, त्यादिवशी हा सर्व प्रकार घडला. या सामन्याआधी कर्णधार आणि कोचमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले. दोघांपैकी कोणीच काहीही बोललं नाही, मात्र त्यांच्या हावभावावरुन ते  स्पष्ट झाले.

दरम्यान, रविवारी टीम इंडिया आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. कोहली आणि कुंबळेमधील वादामुळे संघाच्या कामगिरीवर फरक तर पडणार नाही ना याची चिंता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे बीसीसीआयने अनिल कुंबळेंचा करार संपत असल्याने प्रशिक्षक पदासाठी भरती सुरु करत असल्याची घोषणा केली होती. प्रशिक्षकपदाच्या या स्पर्धेत अनिल कुंबळेचं नावदेखील आहे. त्यांचीही पुन्हा निवड होऊ शकते. कुंबळेच्या नेतृत्वाखाली संघ इतकी चांगली कामगिरी करत असताना नवी प्रशिक्षकाची गरज काय ? असा सवाल उपस्थित करण्यात आलाय.
 
तर दुसरीकडे विराट कोहलीने कुंबळेच्या कडक शिस्तीची तक्रार सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीकडे केली होती. यानंतर हा वाद उफाळलाय. तसेच वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलाय. त्यामुळे नव्या निवडीकडे लक्ष लागलेय.