कोलकाता : १९ डिसेंबरला कोलकात्यामध्ये आयपीएलचा लिलाव होणार आहे, पण हा कार्यक्रम आता धोक्यात आला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात आंदोलनं सुरु आहेत. पश्चिम बंगालमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे, त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल टीम मालक तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
'जास्त घाबरण्याची गरज नाही, पण तिकडे नेमकं काय चाललं आहे याची माहिती सगळ्यांना हवी आहे. आयपीएलचा लिलाव गुरुवारी होणार आहे आणि आज तिकडे रॅली काढण्यात आली. आम्हाला तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवावं लागेल,' असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
कोलकात्याच्या मालदा, मुर्शिदाबाद, हावडा, नॉर्थ २४ प्रगांड आणि साऊथ २४ प्रगांड या भागांमध्ये हिंसक आंदोलनांमुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी २० डिसेंबरला आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतची रणनिती ठरवली जाणार आहे.
आयपीएल लिलावासाठी बहुतेक सदस्य मंगळवारी कोलकात्यात येणार आहेत आणि २० डिसेंबरला परत जाणार आहेत, असं एका टीमच्या अधिकाऱ्याने सांगितलं. तर बीसीसीआयने सुरक्षा आणखी कडक करण्याचं आवाहान केलेलं नाही, त्यामुळे आमच्याकडे वाट बघण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असं आयपीएल टीमचा आणखी एक अधिकारी म्हणाला.