Ravindra Jadeja: इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यामध्ये सध्या टेस्ट सिरीज सुरु आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये पहिला टेस्ट सामना सुरु असून यावर भारताचं वर्चस्व दिसून येतंय. मात्र या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना एक विचित्र घटना घडलेली दिसली. रविंद्र जडेजाच्या विकेटवरून आता वादंग माजण्याची शक्यता आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाला शतक झळकावण्याची चांगली संधी होती. मात्र थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर त्याला पव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या अखेरीस रविंद्र जडेडजा 81 रन्सवर नाबाद होता. तिसऱ्या दिवशी जडेजाकडे शतक ठोकण्याची चांगली संधी होती. मात्र यावेळी थर्ड अंपायरने दिलेल्या विवादित निर्णयाने त्याचं शतक हुकलं.
जो रूटच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाविरुद्ध एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील करण्यात आलं. मैदानावरील अंपायरने आऊट करार झाल्यानंतर जडेजाने लगेच डीआरएस मागवला. यावेळी रिप्लेमध्ये बॉल एकाच वेळी बॅट आणि पॅडला लागल्याचं दिसून आलं. थर्ड अंपायरने अनेक वेळा रिप्ले पाहिला पण बॉल बॅटला लागला की पॅडला हे स्पष्ट झालं नाही. यावेळी मैदानावरील अंपायरने बॉल पॅडला लागल्याचं मानलं असल्याने थर्ड अंपायरनेही तसाच करार दिला. परिणामी रवींद्र जडेजाला परतावं लागलं. बॉलच्या इम्पॅक्टसोबत विकेट्स देखील हीट होत असल्याने अंपायरने हा कॉल घेतला.
रवींद्र जडेजा 87 रन्सची इनिंग खेळून आऊट झाला. 180 बॉलच्या खेळीत त्याने 7 फोर आणि 2 सिक्स लगावले. यावेळी अक्षर पटेलसोबत 8 व्या विकेटसाठी 78 रन्सची पार्टनरशिप झाली. जडेजा बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या उर्वरित खेळाडूंना एकही रन करता आला नाही.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच.