विजेतेपदानंतर गुजरात टायटन्सवर पैशांचा पाऊस; पुरस्कार विजेते खेळाडूही मालामाल

गुजरात टायटन्सचे खेळाडू विजयाच्या आनंदात असताना त्यांच्या आनंदात पुन्हा एकदा भर पडली आहे. 

Updated: May 30, 2022, 01:20 PM IST
विजेतेपदानंतर गुजरात टायटन्सवर पैशांचा पाऊस; पुरस्कार विजेते खेळाडूही मालामाल title=

मुंबई : आयपीएलचा यंदाचा सिझन अखेर संपला. नव्या टीमच्या विजयाने आयपीएलला एका नवा विजेता मिळाला आहे. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव करत आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. दरम्यान गुजरात टायटन्सचे खेळाडू विजयाच्या आनंदात असताना त्यांच्या आनंदात पुन्हा एकदा भर पडली आहे. 

आयपीएलची ट्रॉफी जिंकल्याबद्दल विजेत्या गुजरात टीमला तब्बल 20 कोटी रुपयांचं बक्षिस मिळालंय. तर उपविजेत्या राजस्थान रॉयल्सच्या टीमला 13 कोटी इतकी रक्कम देण्यात आली आहे. शिवाय तिसऱ्या स्थानावर असलेल्या आरसीबी टीमला 7 कोटी रुपये मिळाले असून तर लखनऊ टीमला 6.5 कोटी रुपयांचं बक्षिस देण्यात आलं आहे.

विजेत्या टीमसोबत यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही बक्षिस देण्यात आलं आहे. तर यंदाच्या सिझननंतर सर्वाधिक रन्स करणारा जॉस बटलरला ऑरेंज कॅप देण्यात आली. तर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युझवेंद्र चहलला पर्पल कॅप मिळाली आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी दोघांनाही प्रत्येकी 15 लाख रुपये देण्यात आलेत.

मोस्ट व्हॅलुएबल प्लेयर ऑफ द सीझनचा खिताब बटलरला मिळाला असून त्यासाठी त्याला 12 लाख रुपयांचं बक्षिस दिलंय. सर्वाधिक म्हणजे 45 सिक्सेस बटलरने मारल्या असून क्रॅक इट सिक्सेज ऑफ द सीझनचं बक्षीसही त्यालाच मिळणार असून आणखी 12 लाख त्याला मिळणार आहे. 

दरम्यान कालच्या सामन्यात लॉकी फर्ग्यूसनने 157.3 kmph च्या वेगाने बॉल टाकला असून हा या सिझनमधील सर्वात वेगवान बॉल असल्याने त्यालाही 10 लाख रुपयांचं बक्षिस दिलं गेलंय. सनरायझर्स हैदराबादच्या उमरान मलिकला इमरजिंग प्लेयर ऑफ द सीझनचा खिताब पटकावत त्याला 20 लाख रुपये दिलेत.