बुमराह-एनसीएमधला वाद विकोपाला, गांगुली मध्यस्थी करणार

राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आणि जसप्रीत बुमराह यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे.

Updated: Dec 20, 2019, 07:31 PM IST
बुमराह-एनसीएमधला वाद विकोपाला, गांगुली मध्यस्थी करणार title=

मुंबई : राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आणि जसप्रीत बुमराह यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. राहुल द्रविड प्रमुख असलेली एनसीए आणि बुमराह यांच्यातला वाद आणखी वाढू नये, म्हणून बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मध्यस्थी करणार आहे. बुमराह एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट देईल, असं गांगुलीने स्पष्ट केलं आहे. या मुद्द्याबद्दल मला माहिती नाही, पण भारतीय खेळाडूंना एनसीएमध्ये जावं लागेल, असं गांगुली म्हणाला. 

एनसीएने बुमराहची फिटनेस टेस्ट घ्यायला नकार का दिला? याबाबत मी माहिती घेईन आणि मग प्रतिक्रिया देईन. मी द्रविडला भेटून अडचणी जाणून घेतल्या. या अडचणी सोडवल्या जातील. मी द्रविडला अनेकदा भेटलो आहे. अध्यक्ष होऊन मला काही दिवसच झाले आहेत, असं वक्तव्य गांगुलीने केलं.

स्ट्रेस फॅक्चरनंतर बुमराह उपचारांसाठी लंडनला गेला होता. पण बुमराहने एनसीएमध्ये यायला नकार दिला. तसंच बुमराहने उपचारासाठी खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला. फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी बुमराह एनसीएमध्ये जाण्याऐवजी विशाखापट्टणममध्ये भारतीय टीमसोबत सराव करताना दिसला. जसप्रीत बुमराहच्या या निर्णयामुळे एनसीएचा संचालक राहुल द्रविड नाराज झाला. द्रविड आणि फिजिओथेरपिस्ट आशिष कौशिक यांनी बुमराहची फिटनेस टेस्ट घ्यायला नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जसप्रीत बुमराह जर खासगी डॉक्टरकडून सल्ला घेत असेल, तर त्याला एनसीए प्रमाणपत्र कसं देणार? भविष्यात बुमराहला दुखापत झाली तर काय करायचं? असे प्रश्न द्रविडने विचारले आहेत आणि बुमराहची फिटनेस टेस्ट घ्यायला नकार दिला आहे. भारतीय टीममध्ये पुनरागमन करण्यासाठी बुमराहला एनसीएकडून फिटनेसचं प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे. दुखापतीतून सावरत असताना बुमराह एक आठवडा एनसीएमध्ये होता.

एनसीएच्या कार्यक्षमतेवर गेल्या काही दिवसांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत. भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीनंतर एनसीएवर टीकाही झाली होती. एनसीएनं फिट असल्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतर भुवनेश्वर पुन्हा दुखापतग्रस्त झाला आणि त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजला मुकावं लागलं. ऋद्धीमान सहाला देखील असाच अनुभव आला होता. बुमराहप्रमाणेच हार्दिक पांड्यानेही एनसीएमध्ये जायला नकार दिल्याचं वृत्त आहे.