मुंबई : येत्या 23-25 मार्चला पुण्याच्या बालेवाडीत एक इतिहास रचला जाणार आहे. 31 राज्ये आणि 8 शासकीय क्रीडा संस्थांमधील तब्बल 600 पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग भारतीय शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्यात येत्या 23 ते 25 मार्चदरम्यान होणाऱ्या अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार सौष्ठवाचे प्रदर्शन करण्याची ही पहिलीच वेळ असेल. भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पीळदार स्नायूंच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी पुणेकर जोरदार तयारीला लागले आहेत. भारत श्री निमीत्ताने भारतीय शरीरसौष्ठव क्षेत्राचे सारे मार्ग बालेवाडीच्या दिशेने वळणार असल्यामुळे मार्च महिन्यात पुणेकरांच्या नसानसांत शरीरसौष्ठव भिनल्यावाचून राहणार नाही, असा विश्वास इंडियन बॉड़ी बिल्डर्स फेडरेशनचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी बोलून दाखविला.
गेल्या पाच-सहा वर्षात भारतात शरीरसौष्ठवाची वाढलेली केझ पाहाता भारतीय शरीरसौष्ठवाच्या पुंभमेळ्याचे ग्लॅमरही तितकेच वाढत आहे. केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याची मान्यता असलेला भारतीय शरीरसौष्ठव महासंघ राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय शरीरसौष्ठवाची खरी ताकद अवघ्या देशाला दाखवतोय. यंदाही पुण्यात त्याच जोशात, त्याच जल्लोषात शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा साजरा करण्यासाठी संघटना सज्ज असल्याची माहिती संघटनेचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर यांनी दिली. यंदाही स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. सोबतीला खेळाडूंनाही सर्व सोयीसुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरविल्या जाणार आहेत. भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व खेळाडू-पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये आदरातिथ्य केले जाणार आहे. निवास आणि भोजन या दोन्ही व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे आमच्यापुढे फार मोठे आव्हान होते आणि ते आव्हान आम्ही पेलले असल्याचेही अभिमानाने तळवलकरांनी सांगितले. महासंघाच्या पदाधिकाऱयांनीच पुढाकार घेतल्यामुळे यंदाची भारत श्री फाइव्हस्टार करण्याचे आम्हाला शक्य झाले. तसेच आमच्या सोबतीला ऑप्टीमम न्यूट्रीशन, विवा फिटनेस आणि तळवलकर्स खंबीरपणे उभे राहिले असल्याचे व्यायाममहर्षींनी आवर्जून सांगितले.
भारत श्रीचे भव्य आयोजन हे नेहमीच एक आव्हान असते. हजारापेक्षा अधिक संख्या असलेल्या खेळाडू-पदाधिकाऱ्यांची निवास-भोजन व्यवस्था जशी आम्ही संस्मरणीय केलीय, तसाच संस्मरणीय अनुभव पुरस्कार विजेत्यांनाही मिळणार आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच 50 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची रोख बक्षीसे विजेत्यांना दिली जाणार आहेत. स्पर्धेचा विजेता 7.5 लाख रुपयांचा मानकरी ठरेल. उपविजेत्याच्या खिशात 3.5 लाख रूपयांचे इनाम असेल तर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू 2 लाखांचा धनी होईल. त्याचबरोबर दहा गटांच्या या स्पर्धेत प्रथमच गटविजेता लखपती होणार आहे. गटातील पहिल्या पाच क्रमांकाना 1 लाख, 70 हजार, 50 हजार, 30 हजार आणि 20 हजार रुपयांचे रोख इनाम देऊन गौरविले जाईल. अशीच बक्षीसे महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धा आणि फिजीक स्पर्धेलाही असतील, अशीही माहिती चेतन पाठारे यांनी दिली.
भारत श्री मध्ये आजवरची सर्वात मोठ्या रोख रकमेची बक्षीसे ठेवण्यात आल्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा उत्साह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या स्पर्धेतही महाराष्ट्राचे खेळाडू आपला ठसा उमटविण्यासाठी गेले दोन महिने आठ-आठ तास जिममध्ये घाम गाळत आहेत. या स्पर्धेत यजमान महाराष्ट्राच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अद्याप मुंबई श्री आणि महाराष्ट्र स्पर्धा व्हायच्या असल्या तरी सलग दोनदा विजेता ठरलेला सुनीत जाधव, सागर कातुर्डे, मि. वर्ल्ड महेंद्र चव्हाण, नितीन म्हात्रे जोरदार तयारीत आहेत. या दिग्गजांकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा बाळगली जात आहे. महाराष्ट्राचे 20 पेक्षा शूरवीर या स्पर्धेत उतरणार असल्यामुळे पदकवीरही मोठ्या संख्येने असतील. महाराष्ट्राची सध्याची कामगिरी पाहाता सांघिक विजेतेपद जिंकल्यास कुणाला आश्चर्य वाटणार नाही, असे महाराष्ट्राची सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे म्हणाले.
यंदा महाराष्ट्रासमोर तगडे आव्हान असेल ते रेल्वेचे. त्यांचे जावेद अली खान, राम निवास, किरण पाटील, सागर जाधव, भास्करन आणि प्रीतम चौगुले यांची तयारी पाहून सारेच अवाप् झाले आहेत. त्याचप्रमाणे यतिंदर सिंग, दयानंद, बॉबी सिंग, सर्बो सिंगसारखे अनेक खेळाडू आपले सर्वोत्तम खेळ दाखविण्यासाठी सज्ज होत आहेत. स्पर्धेला अजून दीड महिना असल्यामुळे आणखीही अनेक चांगली नावे भारत श्रीमध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या दहा गटांमध्ये भारतीय शरीरसौष्ठवाची खरी ताकद पाहण्याचे भाग्य पुणेकरांना मिळणार असून महिलांच्या शरीरसौष्ठवाचाही पीळदार नजराणा अनुभवता येईल.
पुरूषांच्या दहा गटात किमान 400 पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग अपेक्षित आहे. तरीही हा आकडा स्पर्धेपूर्वी वाढेल, असे भाकित सरचिटणीस चेतन पाठारे यांनी वर्तवले आहे. महिला गटातही देशभरातून किमान 25 शरीरसौष्ठवपटू येतील. यात सरिता देवी, रेबिता देवी, कांचन अडवाणी, ममता देवी, युरोपा भौमिक हे ओळखीचे चेहरेही असतीलच. त्याशिवाय फिजीक स्पोर्टस् प्रकारात महिला आणि पुरूष मॉडेल मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे या गटातही जेतेपदासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळेल. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची वजन तपासणी 23 मार्चला, प्राथमिक फेरी 24 मार्चला आणि अंतिम फेरीत 25 मार्चला पार पडेल.