नवी दिल्ली : क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था म्हणून नावलौकीक असलेल्या क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. जागतिक डोपींग विरोधी संस्थेने (वाडा) दिलेल्या इशाऱ्यामुळे बीसीसीआयला हा धक्का बसला आहे.
जागतिक क्रिकेट काऊन्सीलच्या (आयसीसी) निर्णयावर बीसीसीआयचा असलेला प्रभाव सर्वांनाच माहिती आहे. अॅण्टी डोपिंग परीक्षण प्रकरणी बीसीसीआय काहीसा वेगळा विचार करत आहे. सध्यास्थितीत बीसीसीआय डोपिंगच्या विरोधात आहे. पण, बीसीसीआय ही संस्था स्वत:ला डोपिंग विरोधी संस्थेच्या (नाडा) प्रभावाखाली स्वत:ला ठेऊ इच्छित नाही. अनेकदा बीसीसीआयने नाडाच्या विरोधातही निर्णय घेतल्याचे पहायला मिळाले आहे.
या पार्श्वभूमीवर सैद्धांतिक स्वरूपात एकमत होऊनही दोन्ही संस्थांमध्ये नेहमी होणारा संघर्ष भारतीय खेळासाठी मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे यात आता जागतिक डोपिंग विरोधी संस्था वाडाने लक्ष घातले आहे. वाडाने आयसीसीला सांगितले आहे की, तुम्ही या प्रकरणात बीसीसीआयला वेळीच योग्य ते निर्देश द्या की, नाडाला भारतीय क्रिकेटपटूंची 'ड्रग टेस्ट' करण्यासाठी मान्यता द्या.
दरम्यान, वाडाने इशारा दिला आहे की, जर असे घडले नाही तर, नाडा ही संस्था वाडासोबतची आपली अधिकृत मान्यता गमावू शकते. वाडाने हा इशारा केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. या पत्रास स्पष्टपणे लिहीले आहे की, दोन संस्थांमधला हा संघर्ष हा भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये अडथळा ठरतो आहे. जर, नाडा वाडाच्या नियमांनुसार काम करू शकत नाही तर, त्याचा परिणाम भारतीय खेळांच्या डोपिंगविरोधातील लढाईवर होईल. ज्यामुळे भारतीय खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीवर नकारात्मक प्रभाव पडेल.