BCCI : इंडियन प्रिमीयर लीग ( Indian Premier League ) ही देशातील सर्वात मोठी लीग मानली जाते. या क्रिकेट लीगसाठी जगभरातून विविध खेळाडू भारतात खेळण्यासाठी येतात. इंडियन क्रिकेट लीग पाहता इतर देशांनी देखील त्यांची टी-20 लीग सुरु केली आहे. मात्र टीम इंडियामध्ये एक्टिव्ह असणारे खेळाडू या लीगमध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत. अशावेळी खेळाडू रिटायरमेंट घेऊन या लीगमध्ये खेळतात. अशाच खेळाडूंसाठी आता बीसीसीआय ( BCCI new rule ) नवा नियम काढण्याच्या तयारीत आहे.
या नव्या नियमांनुसार, रिटायरमेंट घेतल्यानंतर खेळाडू तातडीने दुसऱ्या देशांच्या लीगमध्ये खेळता येणार नाहीये. मुळात बीसीसीआयचं अपेक्स काऊंसिल रिटायर होणाऱ्या खेळाडूंसाठी काही महत्त्वाचे नियम लागू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, अपेक्स काऊंसिल रिटायर झालेल्या खेळाडूंसाठी काही नियम लागू करणार आहेत. यामध्ये निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंना 'कूलिंग ऑफ पिरीयड' ( Cooling-off period ) ठेवण्यात आला आहे. ज्यानंतर निवृत्ती स्विकारलेले खेळाडू टी-20 लीगमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.
येत्या 7 जुलै रोजी अपेक्स काऊंसिलची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये 'कूलिंग ऑफ पिरीयड' ( Cooling-off period ) याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती घेतल्यानंतर या खेळाडूंसाठी तब्बल एका वर्षाचा 'कूलिंग ऑफ पिरीयड' असण्याची शक्यता आहे.
विदेशी टी-20 लीगमध्ये खेळाडूंना भरपूर पैसा ऑफर करण्यात येतो. भारतीय खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची अनुमती नसल्याने काही खेळाडू निवृत्ती घेतात आणि या लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतात. गेल्या काळात निवृत्ती घेतल्यानंतर खेळाडूंनी एका आठवड्याच्या आत विदेशी लीगमध्ये खेळले असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान येत्या काळामध्ये असं होणं, मोठी अडचण ठरू शकते, असा विचार करता बीसीसीआय ( BCCI ) हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपेक्स काऊंसिलच्या बैठकीत एशियन गेम्सबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये एम्पॅक्ट प्लेअरचा रुल लागू करण्याबाबत देखील चर्चा केली जाऊ शकते. नुकताच हा नियम आयपीएल 2023 मध्ये वापरण्यात आला होता.