बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला मिळणार एवढं मानधन

सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 

Updated: Oct 23, 2019, 01:18 PM IST
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला मिळणार एवढं मानधन title=

मुंबई : सौरव गांगुली याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. गांगुलीच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयच्या नव्या समितीने पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर नियुक्त केलेली प्रशासकीय समिती बरखास्त झाली आहे. यानंतर आता बीसीसीआय प्रशासकीय समितीला त्यांचं मानधन देणार आहे.

काही काळासाठी प्रशासकीय समितीचे सदस्य असलेल्या रामचंद्र गुहा आणि विक्रम लिमये यांनी बीसीसीआयकडून मिळणारं मानधन नाकारलं आहे, असं वृत्त इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलं आहे. रामचंद्र गुहा यांना ४० लाख रुपये आणि विक्रम लिमये यांना ५०.५ लाख रुपये मिळणार होते.

दुसरीकडे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय आणि माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी यांना जवळपास ३.५ कोटी रुपये मानधन मिळेल. प्रशासकीय समितीचे तिसरे सदस्य रवी थोडगे यांना ६० लाख रुपये मिळणार आहेत. प्रशासकीय समितीला पुढच्या ४८ तासांमध्ये मानधन द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिले आहेत.

जानेवारी २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर प्रशासकीय समितीची नेमणूक केली. पण यानंतर ४ महिन्यांमध्येच रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. परस्पर हितसंबंधांच्या वेगेवगळ्या प्रकरणांवर आक्षेप घेत गुहांनी हे पद सोडलं. तर लिमये ५ महिन्यांसाठी सदस्य होते, पण त्यांनीही राजीनामा देऊन नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये पद स्वीकारलं.