मुंबई : द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय जाहीर केलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये.
या प्रकरणी द. आफ्रिकेत पोहोचलेले क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले होते की, स्मिथ, वॉर्नर आणि बेनक्राफ्ट आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी सिद्ध झालेत. यासाठीच त्यांना कसोटीतून बाहेर करण्यात आलेय.
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं. तिसऱ्या दिवशी लंच सुरु असताना बॉलची छेडछाड करण्याचं वरिष्ठ खेळाडूंनी ठरवल्याचं स्मिथनं मान्य केलं. लंचमध्ये झालेल्या बैठकीत स्मिथ आणि वॉर्नर असल्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.