सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला शनिवार १२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम ३३ वर्ष जुन्या अंदाजात दिसणार आहे. ऍरोन फिंचच्या नेतृत्वात जेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम मैदानात उतरेल, तेव्हा सगळ्यांना ३३ वर्ष जुन्या ऑस्ट्रेलियन टीमची आठवण होईल. कारण या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम त्यांच्या १९८०च्या दशकातली रेट्रो वनडे कीट घालून मैदानात उतरणार आहे.
१९८६ साली ऑस्ट्रेलिया टीमच्या जर्सीला 'ग्रीन ऍण्ड गोल्ड' नावानं ओळखलं जायचं. या सीरिजमध्येही ऑस्ट्रेलियाचे खेळाडू तशीच जर्सी घालून खेळणार आहेत. हा अनुभव आमच्यासाठी शानदार आहे. प्रत्येक खेळाडू ही जर्सी घालण्यासाठी उत्साही आहे, असं ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पीटर सीडल म्हणाला आहे.
Peter Siddle is pumped the Aussies are wearing the retro ODI kit to take on India!#AUSvIND | @alintaenergy pic.twitter.com/aGmpgXMrl2
— cricket.com.au (@cricketcomau) January 10, 2019
भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींचं या जर्सीची खास कनेक्शन आहे. १९८६ साली भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला गेली होती. तेव्हा भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये ट्राय सीरिज झाली. या ट्राय सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियानं हीच जर्सी वापरली होती. या ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये भारत पोहोचला होता, पण बेस्ट ऑफ थ्री फायनलच्या पहिल्या दोन मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला.
रवी शास्त्रींनी या सीरिजच्या १२ मॅचच्या ९ इनिंगमध्ये २५.२५च्या सरासरीनं आणि ६६.२२ च्या स्ट्राईक रेटनं २०२ रन केले होते. यामध्ये फक्त एका अर्धशतकाचा समावेश होता. तर बॉलिंग करताना शास्त्रींनी ३३.६६च्या सरासरीनं आणि ३.४८च्या इकोनॉमी रेटनं एकूण १२ विकेट घेतल्या होत्या.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिली वनडे १२ जानेवारीला सिडनीमध्ये, दुसरी वनडे १५ जानेवारीला ऍडलेडमध्ये आणि तिसरी वनडे १८ जानेवारीला मेलबर्नमध्ये खेळवली जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत १२८ वनडे मॅच झाल्या आहेत, यातल्या ७३ मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा आणि ४५ मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे. तर १० मॅचचा कोणताही निकाल लागला नाही.
भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मिचेल मार्श खेळणार नाही. मार्शऐवजी एश्टन टर्नरची टीममध्ये निवड करण्यात आली आहे. मिचेल मार्श मागच्या दोन दिवसांपासून पोटाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये मार्शच्या सहभागाबाबत नंतर निर्णय घेऊ, असं ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅन्गर म्हणाले.
एरॉन फिंच (कर्णधार), उस्माम ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ग्लेन मॅक्सवेल, मार्क्स स्टोइनिस, एलेक्स कॅरी (विकेट कीपर), जॉय रिचर्डसन, बिली स्टैनलेक, जेसेन बेहरेनडोर्फ, पीटर सीडल, नॅथन लायन, एडम जम्पा आणि एश्टन टर्नर
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंग धोनी (विकेट कीपर), हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद आणि मोहम्मद शमी