ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामधली पहिली टेस्ट ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये सुरु होईल. पण त्याआधीच ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांनी मैदानाबाहेरच्या खेळाला सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेटपटू डरपोक असल्याची बातमी ऑस्ट्रेलियातल्या एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केली आहे. भारतीय टीम ऍडलेडमध्ये पोहोचल्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांनी मुक्ताफळं उधळायला सुरुवात केली आहे.
ऑस्ट्रेलियातल्या टॅबलॉईडनं THE SCAREDY BATS असं शिर्षक देऊन ही बातमी छापली आहे. या बातमीमध्ये भुवनेश्वर कुमार आण रवींद्र जडेजाचा फोटो छापला आहे. या बातमीमध्ये वेगवेगळ्या मैदानातल्या भारतीय टीमच्या भीतीची कारणं दाखवण्यात आली आहे. पण भारतीयच नाही तर ऑस्ट्रेलियातल्या क्रिकेट चाहत्यांनीही अशाप्रकारच्या बातमीवर नाराजी व्यक्त केली आहे. क्रीडा पत्रकार रिचर्ड हाईंड्स यांनी अशाप्रकारच्या बातमीवर टीका केली आहे.
या बातमीमध्ये भारतीय टीमच्या भीतीची ३ कारणं देण्यात आली आहेत.
१. भारताला ब्रिस्बेनमध्ये उसळणाऱ्या खेळपट्टीची भीती वाटते.
२. पर्थमधली खेळपट्टी जगातली सगळ्यात जलद असल्यामुळे भारतीय खेळाडू घाबरतात.
३ आणि ऍडलेडमध्ये भारतीय खेळाडू अंधाराला घाबरतात. भारतानं डे-नाईट टेस्ट खेळायला नकार दिल्यामुळे हे कारण देण्यात आलं.
Anyone else tired of the childish and predictable mocking of visiting teams by Australian media? It’s become a boorish tradition that reflects poorly on our country.#AUSvIND pic.twitter.com/3bFgFSgaWZ
— Richard Hinds (@rdhinds) December 2, 2018
ब्रायडन कॉवर्डेलनी क्रीडा पत्रकार रिचर्ड हाईंड्स यांचं समर्थन केलं आहे. विराट कोहलीला उचकवू नका. मागच्या वेळी कोहलीनं चार शतकं केली होती. विजयनं ६० आणि रहाणेनं ५७ च्या सरासरीनं रन केले होते. असं ब्रायडन कॉवर्डेलनी लिहिलं आहे.
विरोधी टीमचं मनोबल खचवण्यासाठी अशाप्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करणं ही ऑस्ट्रेलियातल्या माध्यमांची जुनी सवय आहे. यावेळीही त्यांनी अशाचप्रकारच्या बातम्यांचा आधार घेतला आहे. पण ऑस्ट्रेलियातल्याच क्रिकेट रसिकांनी त्यांच्या माध्यमांचा हा डाव उधळून लावला आहे.