एडिलेड : ऑस्ट्रेलिया टीमचे मुख्य कोच जस्टिन लँगर यांनी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराट कोहलीची तुलना त्यांनी महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरसोबत केली आहे. लँगर यांनी विराटची बॅटींग ही अविश्वसनीय असल्य़ाचं म्हटलं आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात मंगळवारी झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये शतक ठोकत १०४ रनती महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्याचं वनडे मधील हे ३९ वं शतक होतं.
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना लँगर यांनी म्हटलं की,' सचिन आणि विराट हे दोघेही मला माझ्या टीममध्ये हवे होते. सचिन अविश्वसनीय खेळाडू आहे. मी त्याला बघायचो तर असं वाटायचं की तो ध्यान करत आहे. खूप शांत असायचा आणि त्यामुळेच ऐवढे रेकॉर्ड बनवले. विराट देखील तिच गोष्ट करतो आहे. तो शांत राहतो. तो एक प्रतिस्पर्धी आहे. त्याचं बॅटींगवर असलेलं नियंत्रण अविश्वसनीय आहे.'
लँगर यांनी पुढे म्हटलं की, 'कोहली हा शानदार प्रतिद्वंद्वी आहे. त्याची एकाग्रता कमालीची आहे. सचिन, कोहली, धोनी यांचा रनरेट ३४० सामन्यांमध्ये ५० हून अधिक आहे. हे सगळे महान क्रिकेटर आहेत. आमचे खेळाडू सध्या या काळातील महान खेळाडूंसोबत खेळत आहेत. अनुभवाना माणूस अधिक चांगला होतो.'
धोनीने या सामन्यात ५४ बॉलमध्ये ५५ रन केले. लँगरने म्हटलं की, 'ज्या प्रकारे कोहली आणि धोनीने आज बॅटींग केली. ती जेव्हा तुम्ही पाहता ती शानदार वाटते. हे महान खेळाडू आहेत. आम्हाला यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.'