ऑस्ट्रेलियाच्या पोरींची मालिकेत विजयी आघाडी, भारताचा सलग दुसरा पराभव!

हरमनप्रीत आणि रिचाच्या खेळीवर पाणी!

Updated: Dec 18, 2022, 01:20 AM IST
ऑस्ट्रेलियाच्या पोरींची मालिकेत विजयी आघाडी, भारताचा सलग दुसरा पराभव! title=

Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील महिला टी-20 मालिकेमध्ये महिला भारतीय संघाचा चौथ्या सामन्यातही पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-1 ने विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 189 धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावत 181 धावा करता आल्या. 7 धावांनी चौथ्या टी-20 सामन्यामध्ये पराभव झाला. 

ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू एलिस पेरीने सर्वाधिक नाबाद 72 धावा केल्या. गार्डनरनेही 42 धावा करत मोलाचं योगदान दिलं. भारतीय संघाकडून आजही स्मृती मानधना स्वस्तात परतली. हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 46 धावा केल्या, त्यानंतर रिचा घोषने अवघ्या 19 चेंडूत 40 धावा करत विजयाच्या आशा जागवल्या होत्या. मात्र शेवटी भारताचा 7 धावांनी पराभव झाला. 

दरम्यान, पहिला सामना गमावल्यानंतर मालिकेतील दुसरा सामना टाई झाला होता, त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये भारताने रोमहर्षक विजय मिळवला होता. तिसरा सामन्यातही भारतीय संघाला लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. आजच्याही सामन्यात 5 धावांनी लक्ष्यापासून वंचित राहिले. त्यामुळे भारताने ही मालिका गमावली आहे.