आता भारतीय महिलाही 'पावरफुल' आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात 19 महिलांची ताकद

15 ते 21 जुलैदरम्यान मालदीवमध्ये रंगणाऱ्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय महिला खेळाडू सज्ज  

Updated: Jul 13, 2022, 09:34 PM IST
आता भारतीय महिलाही 'पावरफुल' आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात 19 महिलांची ताकद title=

मुंबई : शरीरसौष्ठव खेळ हा पुरूषप्रधान आहे, ही समजूत खोडून काढण्यासाठी भारतीय महिला खेळाडू सज्ज झाल्या आहेत. येत्या  15 ते 21 जुलैदरम्यान मालदीवमध्ये रंगणाऱ्या 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या 81 खेळाडूंच्या संघात पाच-दहा नव्हे तर तब्बल 19 महिला खेळाडू आपली पीळदार आणि आकर्षक शरीरयष्टी दाखविणार आहेत. 

महिला खेळाडू रचणार सोनेरी इतिहास?
इतकंच नाही तर काही खेळाडूंकडून सोनेरी इतिहास रचला जाण्याची शक्यता वर्तविली जातेय. विशेष म्हणजे शरीरसौष्ठवाच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने महिला खेळाडू सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चूल-मुल सांभाळणाऱ्या महिला "पावरफुल" झाल्या आहेत, हे आता अवघ्या जगाला पाहायला मिळणार असल्याचा विश्वास भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी बोलून दाखविला.

पुरुष प्रधान संस्कृती मोडीत
ज्याप्रमाणे शरीरसौष्ठव हा खेळ पुरूषप्रधान आहे, तसाच भारत हा देश आजही पुरूषप्रधान संस्कृतीतच गुरफटून पडलाय. मात्र ही संस्कृती मोडीत काढण्यासाठी यावेळी महिला शरीरसौष्ठवपटूंनीच कंबर कसलीय. गेली तीन वर्षे शरीरसौष्ठवाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सोनं जिंकणारी हरयाणाची गीता सैनी यावेळी पदकाची प्रबळ दावेदार आहे. ती म्हणते, मालदीवमध्ये "जन गण मन" चे सूर माझ्या कामगिरीच्या जोरावर निनादावेत, हेच माझे ध्येय आहे आणि गेले तीन महिने मी याचीच तयारी करतेय. 

त्याचबरोबर शरीरसौष्ठवाच्या दोन गटात माधवी बिलोचन, करिष्मा चानू आणि डॉली सैनी या भारताच्या महिलांचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. महत्वाचे म्हणजे गीता शरीरसौष्ठवाबरोबर ऍथलीट फिजीक प्रकारातही खेळणार आहे.

महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत दोन गट
शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत एकंदर दोन गट असतात, एक म्हणजे 50 किलो आणि दुसरा 50 किलोवरील. तसंच  अन्य चार गट मॉडेल फिजीक, स्पोर्टस् फिजीक, ऍथलेटिक फिजीक आणि मॉडेल फिजीक (30 वर्षांवरील) असतात. या चार गटांमध्ये एकूण 15 खेळाडू आपले कौशल्यपणाला लावतील. या चारही गटात भारताच्या एकापेक्षा एक खेळाडू सहभागी होणार आहे. 

मात्र सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी सज्ज झालीय ती मुंबईकर डॉक्टर. होमियोपॅथी डॉक्टर असलेल्या मंजिरी भावसारने आपला व्यवसाय सांभाळता सांभाळता फिटनेस क्षेत्रातही महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक स्पर्धा जिंकलेल्या मंजिरीने चार वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. मात्र यावेळी तिला आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायचीय. भारतासाठी सोनं जिंकून आणायचंय. मंजिरी मॉडेल फिजीक प्रकारामध्ये खेळतेय आणि तिची सध्या कामगिरी आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, पण त्याचबरोबर ती एका 15 वर्षीय मुलाची आईसुद्धा आहे. एक डॉक्टर किंवा एक खेळाडूच नव्हे तर एक आईसुद्धा जग जिंकू शकते, हे तिला भारतीय लोकांना दाखवून द्यायचे आहे. म्हणूनच गेली तीन महिने ती या स्पर्धेची तयारी करतेय आणि आता ते खरं करून दाखवण्याची वेळ आल्याचे ती छातीठोकपणे सांगतेय. 

भारताच्या संघातील सर्वात स्फूर्तीदायक आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे निशरीन पारीख. या बिकीनी घालून आपल्या पीळदार शरीरयष्टीसह 16 वर्षांच्या खेळाडूंना आव्हान द्यायला आशियाई स्पर्धेत उतरत आहेत. वयाने 55 आकडा ओलांडला तरी त्यांची स्पर्धेत उतरण्याची जिद्द वर्षागणिक वाढतच चालली आहे. त्यांच्यासाठी वय हे केवळ अंक आहे. 

फिटनेसमुळेच मी माझ्यातल्या सर्वोत्तम गुणाला जगासमोर आणू शकली आहे. माझ्यासाठी जिंकण्यापेक्षा खेळणं महत्त्वाचं आहे. लढण्याची वृत्ती महत्वाची आहे. त्यामुळे मला जितकी वर्षे शक्य आहे, मी खेळत राहणार. आगामी आशियाई स्पर्धेत निश्चितच खेळता खेळता मला माझी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. भारतासाठी मेडल जिंकायचं आहे. मेडलचा रंग कोणताही असू देत, खेळणं आणि संघर्ष करणं आपल्याला जगायला शिकवतं, हेच मी सर्वांना सांगू इच्छिते, असे निशरीन पारीख म्हणाल्या. 

अभिमानास्पद बाब - हिरल शेठ
इतक्या मोठ्या संख्येने भारतीय संघाकडून महिला खेळाडू आशियाई स्पर्धेत उतरत असल्याची बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. याचाच अर्थ असा की आता शरीरसौष्ठवाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. भारतात आजही पुरूषप्रधान संस्कृती असली तरी आता ती वेगाने बदलतेय आणि आमच्या खेळातही ती बदलतेय. आमच्या खेळाडू केवळ सहभागी व्हायला जात नसून देशासाठी मेडलसुद्धा जिंकून आणतील, याचा मला विश्वास असल्याचे भारतीय शरीरसौष्ठव संघटनेच्या सरचिटणीस हिरल शेठ यांनी सांगितले.

54 व्या आशियाई स्पर्धेत सहभागी भारतीय महिला खेळाडू

शरीरसौष्ठवपटू : गीता सैनी (हरयाणा), माधवी बिलोचन (झारखंड), करिष्मा चानू (मणिपूर), डॉली सैनी (दिल्ली)

फिजीक स्पोर्टस् : मंजिरी भावसार, निशा भोयर, अंकिता गेन, भाविका प्रधान, निशरीन पारीख, नेहा प्रभाकर, लिली हश्नू, बरनाली बासुमटारी, साया बरूआ, अदिती बंब, सोलन जाजो, निधी बिश्त, कल्पना छेत्री,  सोलिमिया जाजो, वीणा चौहान.