आशियाई स्पर्धेत भारताकडून पदकांची सेंच्युरी; महिला कबड्डी संघाने मिळवून दिलं शंभरावं मेडल

Asia games 2023 : 95 पदकांसह भारतीय संघाने शुक्रवारीच 100 पदके निश्चित केली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 100 पदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. तर, यजमान चीन 354 पदकांसह अव्वल स्थानावर आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 7, 2023, 09:02 AM IST
आशियाई स्पर्धेत भारताकडून पदकांची सेंच्युरी; महिला कबड्डी संघाने मिळवून दिलं शंभरावं मेडल title=

19th Asian Games Day : आशियाई खेळ 2023 मध्ये (Asia games 2023) भारतीय (India) खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी सुरुच आहे. 13वा दिवस भारतासाठी खूप चांगला होता. 6 ऑक्टोबर रोजी भारताने एकूण 9 पदके जिंकली ज्यात एका सुवर्ण पदकाचा समावेश होता. हॉकी संघाने अंतिम फेरीत जपानचा 5-1 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. भारताने पुरुष भारतीय क्रिकेट संघासह इतर खेळांमध्ये 9 पदके निश्चित केली आहेत. 13व्या दिवसअखेर भारताच्या पदकांची संख्या 95 वर पोहोचली आहे. मात्र आता भारताने पदकांची शंभरी पार केली आहे.

आशियाई खेळ स्पर्धेमध्ये भारताने पदकांची सेंच्युरी केलीय. स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 100 पदकांची कमाई केलीय. महिला कबड्डीपटूंनी भारताला शंभरावं मेडल मिळवून दिलंय. तैपेईचा पराभव करत भारतीय महिला कबड्डीपटूंनी सुवर्णपदक पटकावलं.. पुण्याच्या स्नेहल शिंदेची कामगिरी महिला कबड्डीपटूंच्या विजयात मोलाची ठरली.. एशियन गेम्समध्ये सुवर्ण कमाई करण्यात महाराष्ट्राचे खेळाडू आघाडीवर राहिले. नागपूरकर ओजस देवताळेने तिरंदाजीत गोल्ड मेडल्सची हॅटट्रिक केली.. तर मिक्स्ड डबल टेनिसमध्ये ऋतुजा भोसलेने रोहन बोपन्नाच्या साथीने गोल्डची कमाई केली. स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेने सुवर्णपदक मिळवून दिलंय.

2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. 25 सुवर्ण पदकांसह भारताने 100 पदके जिंकली आहेत. भारताच्या महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा पराभव करून आपले 100 वे पदक जिंकले. महिला कबड्डी संघानेही सुवर्ण जिंकले आहे. भारताने तैपेईचा 26-24 ने पराभव केला आहे. भारताची शनिवारची सकाळ चांगली झाली आहे. तिरंदाजीतही भारताला दोन सुवर्णपदके मिळाली. यासह एक रौप्य आणि एक कांस्य पदक मिळाले आहे.

नागपूरच्या ओजस देवताळेने जिंकलं सुवर्ण

तसेच भारताच्या ओजस देवताळेने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचलाय. आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीत ओजस देवताळेने सुवर्ण पदक पटकावलं. आशियाई गेम्समध्ये तिसरं सुवर्ण पदक पटकावण्याचा पराक्रम त्याने केलाय. ओजसने तिरंदाजी कम्पाऊण्डमध्ये भारताच्या अभिषेक वर्माविरोधात विजय मिळवला. त्यामुळे या प्रकारात भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक मिळालं. ओजसने याआधी एशियन गेम्समध्ये टीम कंपाऊंड आणि मिक्स टीम कंपाऊंडमध्ये सुवर्ण पदक पटकावलंय. ओजस आणि अभिषेकच्या या सुवर्ण आणि रौप्य पदकामुळे भारताची पदकांची संख्या 99 वर पोहोचली होती. ओजसच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर नागपूरमध्ये त्याच्या राहत्या घरी दिवाळी साजरी केली जातेय.