Ind v Ban Asia Cup : एशिया कप 2023 स्पर्धेच्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात भारताला (Team India) पराभवाचा सामना करावा लागला. बांगलादेशने भारतावर (Bangladesh Beat India) 6 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी भारतासमोर 265 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताचा संघ 259 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून शुभमन गिलने शानदार शतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. पण इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही. अखेरच्या षटकात ऑलराऊंडर अक्षर पटेलने आक्रमक फलंदाजी केली. पण तोही टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
भारताचा प्रयोग फसला
सुपर-4मधल्या शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने संघात काही बदल केले होते. प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज, यांना विश्रांती देण्यात आली. तर तिलक वर्मा, सुर्यकुमार यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आली. पण भारताचा हा प्रयोग सपशेल फसला. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले तर प्रसिद्ध कृष्णाला केवळ 1 विकेट घेता आली. टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी याआधीच टीम इंडियाने पायनलमध्ये प्रवेश केला आहे. 17 सप्टेंबरला भारत आणि श्रीलंका फायनल रंगणार आहे.
भारताची फलंदाजी
विजयासाठी 266 धावांचं आव्हान समोर ठेऊन खेळणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलने (Shubhaman Gill) भारतीय डावाची सुरुवात केली. पण सामन्याच्या पहिल्याच षटकात टीम इंडियाल मोठा धक्का बसला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. त्यानंतर एकही प्रमुख फलंदाज मैदानावर फार काळ टिकला नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला तिलक वर्मा केवळ 5 धावा करुन बाद झाला. तर तर केएल राहुलने 19 धावा केल्या. एशिया कपमध्ये पहिल्यांदाच संघात संधी मिळालेल्या सूर्यकुमार यादवलाही मोठी धावसंख्या करता आली नाही. तो 26 धावा करुन बाद झाला. तर ईशान किशन 5 आणि रविंद्र जडेजा 7 धावांवर बाद झाला.
शुभमन गिलची एकाकी झुंज
एकाबाजूला एकामागोमाग एक फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या बाजूला शुभमन गिलने एकाकी झुंज सुरु ठेवली. शुभमन गिलने शानदार शतक ठोकलं. आपल्या खेळीत त्याने पाच षटकार आणि 8 चौकार लगावले. आंतराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतलं हे त्यांच चौथं शतक ठरलं. पण 121 धावांवर असताना तो झेल बाद झाला. त्यानंतर अक्षर पटेलने 42 धावांची तुफानी खेळी करत भारताला विजयाच्या आशा दाखवल्या. पण तो बाद झाला आणि भारताचा पराभव निश्चित झाला.
भारताची गोलंदाजी
त्याआधी भारताने टॉस जिंकला आणि पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवातही खराब झाली. मोहम्मद शमीने सलामीला आलेल्या लिटन दासला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर शार्दुल ठाकूरने तानिझ हसनला क्लिन बोल्ड करत दुसरा धक्का दिला. शाकिब हल हसनने कॅप्टन इनिंग खेळत शानदार 80 धावा केल्या. त्याला तोहीद (54 धावा) आणि नसिम अहमदने (44 धावा) चांगली साथ दिली. या तीघांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने 265 धावांचं आव्हान भारतासमोर ठेवलं.