Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी

Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 21, 2023, 05:47 PM IST
Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी title=

Asia Cup 2023: आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यांच्या संघात केए राहुल, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर यांनी पुनरागमन केलं आहे. दरम्यान, भारतीय संघाची घोषणा केली जात असताना प्रसारकांकडून एक मोठी चूक झाली. या एका चुकीमुळे सोशल मीडियावर बीसीसीआयला ट्रोल केलं जात आहे. 

झालं असं की, प्रसारकांनी दुपारी 1 वाजून 26 मिनिटांनी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र यावेळी त्यांनी एक चूक केली. त्यांनी शुभमन गिलला संघात स्थान दिलंच नव्हतं. यानंतर सगळीकडे वाऱ्याप्रमाणे ही बातमी पसरली होती. पण थोड्या वेळाने प्रसारकांनी आपली चूक सुधारली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांची पत्रकार परिषद सुरु असतानाच ही चूक सुधारण्यात आली.

प्रसारकांनी जेव्हा संघाची अधिकृत घोषणा केली, तेव्हा त्यात शुभमन गिलचं नाव नव्हतं. यानंतर प्रसारकांनी 1 वाजून 35 मिनिटांनी आपली चूक सुधारत नव्याने संघ दाखवला ज्यामध्ये शुभमन गिलचं नाव होतं. अशाप्रकारे 9 मिनिटात शुभमन गिलला पुन्हा संघात स्थान मिळालं. 

वसीम जाफरनेही केलं ट्रोल

प्रसारकांनी घातलेल्या या गोंधळामुळे सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत असून, शुभमन गिल ट्रेंडमध्ये आला आहे. सोशल मीडिया युजर्स प्रसारक आणि बीसीसीआय दोघांनाही ट्रोल करत आहेत. माजी भारतीय क्रिकेटर वसीम जाफरनेही माशाचा फोटो टाकत टोला लगावला आहे. 

वसीम जाफरने माशाचे दोन फोटो शेअर केले आहेत. यामधील पहिल्या फोटोत मासा मेलेला दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये जी वेळ लिहिण्यात आली, ती प्रसारकांनी पहिल्यांदाच संघ घोषित केला तो लिहिण्यात आला आहे. पण नंतर त्या माशात जीव आला असून हसताना दाखवण्यात आला आहे. 

सोशल मीडियावर शुभमन गिल ट्रोलिंगचा विषय ठरत असून, अनेकांना मीम्स तयार केले आहेत. काहींनी तर यात सचिन तेंडुलकरलाही ओढलं असून त्याची माफी मागताना दाखवलं आहे. 

कोणत्या खेळाडूंना संधी?

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,  केएल राहुल,  ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.

आशिया कपचं वेळापत्रक:

30 ऑगस्ट: पाकिस्तान vs नेपाळ - मुल्तान
31 ऑगस्ट: बांग्लादेश vs श्रीलंका - कँडी 
2 सप्टेंबर: भारत vs पाकिस्तान - कँडी 
3 सप्टेंबर: बांग्लादेश vs अफगानिस्तान - लाहोर 
4 सप्टेंबर: भारत vs नेपाल - कँडी 
5 सप्टेंबर: श्रीलंका vs अफगानिस्तान - लाहोर 
6 सप्टेंबर: A1 Vs B2 - लाहोर 
9 सप्टेंबर: B1 vs B2 - कोलंबो
10 सप्टेंबर: A1 vs A2 - कोलंबो 
14 सप्टेंबर: A1 vs B1 - कोलंबो 
15 सप्टेंबर: A2 vs B2 - कोलंबो 
17 सप्टेंबर: फायनल - कोलंबो