Asia Cup मध्ये भारताने Match Fixing केल्याचा आरोप; शोएब अख्तर संतापून म्हणाला, 'भारत मुद्दाम...'

Asia Cup 2023 Match Fixing: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी या प्रकरणासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मोठं विधान केलं असून त्याने आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओत हे विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 14, 2023, 09:49 AM IST
Asia Cup मध्ये भारताने Match Fixing केल्याचा आरोप; शोएब अख्तर संतापून म्हणाला, 'भारत मुद्दाम...' title=
आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला व्हिडीओ

Asia Cup 2023 Match Fixing: सध्या सुरु असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये मंगळवारी भारताने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 41 धावांनी विजय मिळवला. या विजयासहीत भारतीय संघ अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिलने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. कर्णधार रोहित शर्माने अर्धशतक झळकावलं. मात्र भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी चाहत्यांची निराशा केली. तरीही भारताने 213 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकन संघाने या धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करता आली नाही. मात्र श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी त्याला झुंजवलं. भारताच्या 5 गड्यांना तंबूत धाडणाऱ्या डुनिथ वेललेजने फलंदाजीमध्येही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. डुनिथ वेललेजच्या फलंदाजीच्या जोरावर श्रीलंका विजय मिळवणार की काय असं एका क्षणी वाटत होतं. मात्र भारताच्या कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा या 2 फिरकी गोलंदाजांनी भारताला विजय मिळवून दिला. 

मधल्या फळीने सावरलं

सलामीवर लवकर तंबूत परतल्यानंतरही श्रीलंकेच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी ज्या प्रकारे झुंज सुरु ठेवली ती पाहून दुसऱ्या डावामध्ये बराच वेळ सामन्याचं पारडं श्रीलंकेच्या बाजूने झुकलेलं. डुनिथ वेललेज आणि धनंजया डिसिलव्हा यांच्या पार्टनरशीपने भारतीय गोलंदाजांचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र याचदरम्यान पाकिस्तानच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावरुन खासकरुन एक्सवरुन (पूर्वीच ट्वीटर) भारतीय संघ मुद्दाम हा सामना हरणार असं म्हणत मॅच फिक्सिंग झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट केल्या. भारतीय गोलंदाज मनापासून गोलंदाजी करत नसून पाकिस्तानला स्पर्धेबाहेर काढण्यासाठी भारत मुद्दाम श्रीलंकेविरुद्ध पराभूत होणार असा दावा पाकिस्तानी चाहत्यांकडून केला जात होता. 

शोएबचं विधान

मात्र भारताने मॅच फिक्सिंग केल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टिकाकारांना झापलं आहे. भारतीय संघाची बाजू घेताना रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने सामना जिंकण्यासाठी मनापासून प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. भारताने मॅच फिक्सिंग केल्याचे दावे बिनबुडाचे असल्याचं म्हणतानाच शोएबने डुनिथ वेललेजला सामनावीर पुरस्कार देण्याच्या निर्णयाचं शोएबनं कौतुक केलं आहे.

नक्की वाचा >> 24 चेंडूंत 114 धावा कुटल्या! T-20 ला लाजवणारी ODI इनिंग; 30 सप्टेंबरला 'तो' भारताविरुद्ध खेळणार

डोकी ठिकाणावर आहेत ना?

"भारताने मॅच फिक्सिंग केल्याचे मसेजेस मला येत आहेत. पाकिस्तानला स्पर्धेबाहेर काढण्यासाठी भारत मुद्दाम वाईट पद्धतीने खेळत असल्याचा दावा यात केला आहे. असे मेसेज पसरवणाऱ्यांची डोकी तर ठिकाणावर आहेत ना? ते (भारतीय गोलंदाजांनी) पूर्ण ताकदीने गोलंदाजी करत होते. डुनिथ वेललेजने उत्तम गोलंदाजी केली. त्याने 43 धावाही केल्या. अचानक मला फोन कॉल आले ज्यावर असं सांगण्यात आलं की, भारत मुद्दाम पराभूत होण्याचा विचार करत असून यामुळे पाकिस्तान स्पर्धेमधून बाहेर पडेल. अरे पण ते असे का पराभूत होतील? ते सामना जिंकून थेट अंतिम सामन्यात जाणार नाही का? काय फालतू चर्चा करताय," असं म्हणत शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनेलवरुन मॅच फिक्सिंगचा दावा करणाऱ्यांना झापलं आहे.

नक्की पाहा >> भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा World Record; आता 'हा' विक्रम मोडणं जवळजवळ अशक्यच

आज पाकिस्तान श्रीलंका सामना

आज श्रीलंका आणि पाकिस्तानदरम्यान सुपर-4 मधील सामना खेळवला जाणार आहे. हा सामना नॉकआऊट सामनाच असणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेबाहेर पडेल तर जिंकणारा संघ भारताविरुद्ध 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळेल.