'तो' Six लगावत रोहित शर्मा झाला '10 हजारी मनसबदार'! पाहा Video

Asia Cup 2023 Ind vs SL Captain Rohit Sharma: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्याच्या सुरुवातीला 22 धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर या अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.

Updated: Sep 12, 2023, 04:38 PM IST
'तो' Six लगावत रोहित शर्मा झाला '10 हजारी मनसबदार'! पाहा Video title=
विराट कोहलीचा अनोखा विक्रम

Asia Cup 2023 Ind vs SL Captain Rohit Sharma: भारताचा कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. सामन्यातील सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने षटकार लगावला. या षटकारासहीत रोहित 17 धावांवरुन 23 धावांवर गेला आणि त्याने 10 हजारांचा टप्पा ओलांडण्यासाठी आवश्यक असलेल्या 22 धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे 10 हजार धावा पुर्ण करणारा तो सहावा खेळाडू ठरला आहे. सर्वात जलद गतीने 10 हजार धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत विराट पहिल्या स्थानी असून रोहितने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. रोहित शर्मा अर्धशतक झळकावून तंबूत परतला. 

रोहितचा खणखीत षटकार

दासुन शनाकाच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने सरळ रेषेत षटकार लगावला. या षटकारासहीत रोहितने 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी हा पराक्रम भारताच्या 5 फलंदाजांनी केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्यांमध्ये रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि एम. एस. धोनीचा समावेश आहे. सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित सचिन तेंडुलकरला मागे टाकत दुसऱ्या पोहोचला आहे. रोहितच्या आधी या यादीत विराट कोहली असून त्याने हा पराक्रम केवळ 205 डावांमध्ये केला आहे. रोहितला या विक्रमापर्यंत पोहोचायला 241 सामने खेळावे लागले. तर सचिनने हा पराक्रम 259 डावांमध्ये केला होता. रोहितने हा टप्पा गाठण्यासाठी लगावलेला षटकार पाहाच...

सर्वाधिक धावा करणारे कोण?

रोहित शर्माने सर्व फॉरमॅटमधील 447 अंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 468 डावांमध्ये 17 हजार 508 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने एकूण 44 शतकं झळकावली असून 4 द्विशतकं झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजेच 18 हजार 426 धावा केल्या आहेत. त्याने 1989 ते 2012 दरम्यान 463 सामन्यांमध्ये 452 डावांमध्ये 44.83 च्या सरासरीने या धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी असून त्याने 2008 पासून आजपर्यंत 278 सामने खेळले असून 57.08 च्या सरासरीने 13 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

रोहित, कोहली दोघेही बाद

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा 48 चेंडूंमध्ये 53 धावा करुन तंबूत परतला. डुनिथ वेललेजच्या फिरकी गोलंदाजी खेळताना चेंडूने उसळी न घेतल्याने रोहित गोंधळला आणि चेंडूने रोहितच्या पाय आणि पॅडमधून गॅप काढत स्टम्प्सचा वेध घेतला. सर्वात आधी शुभमन गिल तंबूत परतल्या. त्यानंतर विराटच्या रुपात भारताला दुसरा धक्का लागला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील शतकवीर विराट कोहली डुनिथ वेललेजच्या फिरकी गोलंदाजीवर चेंडू खेळून काढण्याच्या नादात दासुन शनाकाकरवी झेलबाद झाला. विराट 12 चेंडूंमध्ये 3 धावा करुन तंबूत परतला.

षटकारांचाही विक्रम

आशिया चषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज होण्याचा मानही रोहित शर्माने मिळवला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये रोहितने 4 षटकार लागवल्याने त्याच्या आशिया चषकामधील षटकांची संख्या 26 वर पोहचली होती. आज त्याने दासुन शनाकाच्या गोलंदाजीवर सामन्यातील पहिला षटकार लगावत ही संख्या 27 वर नेली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा आणि शाहीद आफ्रिदी हे प्रत्येकी 26 षटकांसहीत पहिल्या स्थानी होते. रोहितने सामन्यातील सातव्या षटकाला एक षटकार लगावला आणि त्यानंतर 11 व्या षटकामध्ये 39 धावांवर असताना दुसरा षटकार मारला. अर्धशतक झळकावण्याआधी लगावलेल्या या 2 षटकांसहीत रोहित शाहीद आफ्रिदीच्या 2 पावलं पुढे गेला आहे.