Asia Cup 2023 India vs Pakistan: आशिया चषक 2023 च्या स्पर्धेची सध्या 'सुपर-4' फेरी सुरु आहे. पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने बांगलादेशला 7 गडी राखून पराभूत केलं. 'सुपर-4'चे 5 सामने कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत. मात्र या ठिकाणी पुढील 10 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे 'सुपर-4'मधील सर्वच सामन्यांवर पावसाचं सावट आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना 10 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. आता या सामन्यासाठी विशेष नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांमुळे वाद होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयोजकांनी भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच पावसामुळे 10 सप्टेंबरला पूर्ण खेळवता आला नाही तर 11 सप्टेंबर रोजी हा उर्वरित सामना खेळवला जाईल. यापूर्वी साखळी फेरीमध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान सामन्यादरम्यान आयोजकांनी केलेल्या चुकीवरुन टीकेची झोड यापूर्वीच उठली आहे. या चुकीसंदर्भात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली आहे.
नक्की वाचा >> बांगलादेशचा पराभव केल्यानंतर बाबर भारताचा उल्लेख करत म्हणाला, 'आम्ही भारताविरुद्ध...'
'सुपर-4'चे अजून 5 सामने शिल्लक आहेत. या दरम्यान 4 संघ एकमेकांविरोधात खेळणार आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, केवळ 10 सप्टेंबरच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 'सुपर-4'मधील अन्य 4 सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आलेली नाही. म्हणजेच या 4 सामन्यांदरम्यान पाऊस पडला आणि सामना त्या दिवशी खेळवताच आला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण वाटून दिला जाईल. भारत आणि पाकिस्तानच्या संघाला राखीव दिवस असल्याचा फायदा मिळणार आहे. विशेष करुन पाकिस्तानी संघाला याचा अधिक फायदा होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने 'सुपर-4'मधील आपला पहिला सामना यापूर्वीच जिंकला आहे.
नक्की वाचा >> विराट कोहलीसंदर्भात हरभजन सिंगची Double Meaning कमेंट! म्हणाला, 'आम्ही अनेकदा मैदानात...'
'सुपर-4'मध्ये प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहे. पाकिस्तानने एक सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत. तर दुसरीकडे बांगलादेशने पाहिला सामना गमावला आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानच्या संघाने भारताला पराभूत केलं तर त्यांचं अंतिम सामन्याचं तिकीट निश्चित होईल. मात्र भारताने या सामन्यामध्ये पाकिस्तानला पराभूत केलं आणि 'सुपर-4'मधील उर्वरित चारही सामने पावसामुळे रद्द झाले तर भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यामध्ये पुन्हा एकमेकांविरोधात खेळतील. अशा परिस्थितीमध्ये यजमान श्रीलंका कोणताही सामना न खेळता 'सुपर-4'मधून बाहेर पडेल. बांगलादेशचा संघही हे सामने न खेळवले गेल्यास बाहेर पडेल. म्हणजेच भारत-पाकिस्तान वगळता अन्य 2 संघांना त्यांच्या सामन्यांसाठी असे राखीव दिवस नसल्याचा फटका बसू शकतो. आयोजकांनी 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे.
नक्की वाचा >> 14 Ball 64 Runs! भारतीय संघात World Cup साठी संधी न मिळाल्याचा राग त्याने गोलंदाजांवर काढला राग
साखळी फेरीमधील अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंकेदरम्यानच्या शेवटच्या सामन्यामध्ये श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना 291 धावा केल्या. नेट रनरेटच्या जोरावर 'सुपर-4' फेरी गाठण्यासाठी अफगाणिस्तानला 37.1 ओव्हरमध्ये हे लक्ष्य पूर्ण करणं बंधनकारक होतं. मात्र अफगाणिस्तान संघाला 289 धावाच करता आल्या. सामन्यानंतर अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी अधिकाऱ्यांविरोधात आक्षेप घेताना आम्हाला पात्रतेसंदर्भातील सर्व शक्यतांची कल्पनाच देण्यात आली नव्हती असा आरोप केला आहे.
नक्की वाचा >> Ind vs Pak सामन्याआधी गावसकरांचा टीम इंडियाला इशारा! म्हणाले, 'पाकिस्तानचा संघ...'
37 व्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा संघ 8 विकेटच्या मोबदल्यात 289 धावांवर होती. त्यानंतर त्यांना एका चेंडूत 3 धावा करायच्या होत्या. मात्र पुढल्या चेंडूवर मुजीब उर रहमान बाद झाला. म्हणून आपण आता स्पर्धेबाहेर पडलो असं अफगाणिस्तानच्या संघाला वाटलं. मात्र संघ 38.1 ओव्हरपर्यंतच्या खेळादरम्यान नेट रनरेटनुसार स्पर्धेत होता. अफगाणिस्तानी संघाचा स्कोअर 37.2 ला 293, 37.3 ला 294 आणि 37.5 नंतर 295 असता तरी ते पात्र ठरले असते.