Ind vs Pak सामन्याआधी गावसकरांचा टीम इंडियाला इशारा! म्हणाले, 'पाकिस्तानचा संघ...'

IND vs PAK Sunil Gavaskar: भारताचा आशिया चषक स्पर्धेमधील पुढचा सामना 10 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये होणार आहे. हा या स्पर्धेतील भारत-पाकिस्तानचा दुसरा सामना असणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 8, 2023, 01:58 PM IST
Ind vs Pak सामन्याआधी गावसकरांचा टीम इंडियाला इशारा! म्हणाले, 'पाकिस्तानचा संघ...' title=
एका मुलाखतीमध्ये गावसकरांनी केलं हे विधान

IND vs PAK Sunil Gavaskar: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इशारा दिला आहे. पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेसंदर्भात हा इशारा गावसकर यांनी दिला आहे. घरच्या मैदानांवर खेळताना भारत हा संभाव्य विजेता म्हणून अनेकांच्या पहिल्या पसंतीचा संघ असल्याचा उल्लेख करतानाच गावसकर यांनी सतर्कतेचा इशारा टीम इंडियाला दिला आहे.

केवळ 2 जणांना वगळलं

5 सप्टेंबर रोजी भारतीय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संघाची घोषणा केली. 15 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली असून हा संघच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारताचं प्रातिनिधित्व करणार आहे. सध्या आशिया चषक स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघातून केवळ तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांना वगळण्यात आलं असून बाकी संघ जैसे थे ठेवण्यात आला आहे. सध्या भारतीय संघ श्रीलंकेमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळत आहे. सुपर-4 फेरीमध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. दुपारी 3 वाजता हा सामना सुरु होणार आहे. 

भारताला होईल फायदा

विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघाबद्दल गावसकर यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना भाष्य केलं. भारतामध्ये स्पर्धा होत असल्याने प्रेक्षकांचा पाठिंबा भारतीय संघाला मिळेल. तसेच भारतीय संघाला घरच्या परिस्थितीचा चांगला अंदाज असल्याने भारताला याचा फायदा होईल असं गावसकर यांनी म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी गावसकर यांनी रोहितच्या नेतृत्वाखालील संघाला इशारा देताना इतर संघांपासून सावध राहणं आवश्यक आहे. या संघांना आणि खेळाडूंना हलक्यात घेणं रोहितच्या संघाला महागात पडू शकतं असं गावसकर म्हणाले आहेत. 

नक्की वाचा >> 14 Ball 64 Runs! भारतीय संघात World Cup साठी संधी न मिळाल्याचा राग त्याने गोलंदाजांवर काढला राग

भारतच जिंकेल असं सांगता येणार नाही

"घरगुती मैदानांवर खेळताना कायमच संघाला पाठिंबा मिळतो. खेळपट्टी कशी असेल याचाही घरच्या संघाला अंदाज अधिक चांगला असतो. त्यामुळे भारतीय संघ नक्कीच पहिली पसंती असेल. मात्र त्याचवेळी 2 ते 3 असे संघ आहेत जे फार उत्तम आहेत. त्यामुळे तेच (भारतच) जिंकेल की नाही हे सांगणं कठीण आहे कारण क्रिकेट हा अगदी काही ओव्हरमध्ये पारडं पालटणारा खेळ आहे. खास करुन 50 ओव्हरचा सामना असेल तर असं नक्कीच होतं," असंही गावसकरांनी म्हटलं आहे. 

या 4 संघांपासून सावध राहण्याची गरज

गावसकर यांनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंडसारखे संघ उत्तम असल्याचंही म्हटलं आहे. हे संघ भारताला तगडं आव्हान देऊ शकतात. त्यांच्यापासून भारताने सावध राहिलं पाहिजे. "इंग्लंड हा उत्तम संघ आहे. ऑस्ट्रेलियाही चांगला संघ आहे. पाकिस्तानही चांगला संघ आहे. या संघाकडे भारताने लक्ष ठेवलं पाहिजे. तसेच न्यूझीलंड हा कायमच उत्तम खेळणारा संघ आहे हे ही लक्षात असू द्या," असं गावसकर म्हणाले आहेत. 8 ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना होणार आहे. चेन्नईतील चिदम्बरम स्टेडियमवर हा सामना होणार आहे.

नक्की वाचा >> विराट कोहलीसंदर्भात हरभजन सिंगची Double Meaning कमेंट! म्हणाला, 'आम्ही अनेकदा मैदानात...'

विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार ), के. एल. राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव