Asia Cup 2022 : भारताचा कि पाकिस्तानचा क्रिकेटफॅन? का होतेय त्याला तुरुंगात टाकण्याची मागणी

झेंडा भारताचा, जर्सी पाकिस्तानची, या क्रिकेट चाहत्याविरोधात सोशल मीडियावर संताप

Updated: Sep 2, 2022, 06:14 PM IST
Asia Cup 2022 : भारताचा कि पाकिस्तानचा क्रिकेटफॅन? का होतेय त्याला तुरुंगात टाकण्याची मागणी title=

India vs Pakistan : एशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेत 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामनावेळी एका भारतीय क्रिकेटफॅनला (Indian Cricket Fan) पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी घालून जाणं चांगलंच महागात पडलं. उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) राहणाऱ्याया क्रिकेट फॅनवर FIR दाखल करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. इतकंच नाही तर त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण
संयम जयस्वाल असं या क्रिकेटफॅनचं नाव आहे. संयम भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India - Pakistan) सामना पाहण्यासाठी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai Internation Stadium) पोहोचला. स्टेडिअमबाहेर असलेल्या दुकनात भारतीय संघाची जर्सी घेण्यासाठी तो पोहोचला. पण भारतीय संघाची जर्सी उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्याने पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी घेतली आणि त्याच्या डोक्यात प्रँक करण्याचा विचार आला. 

काय होता प्रँक
पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी घालून स्टेडिअममध्ये 'भारत जिंदाबादच्या' घोषणा देत पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांना डिवचण्याचा त्याचा विचार होता. पण हा प्रकार आपल्या अंगलट येईल असा मी विचारही केला नसल्याचं संयम म्हणाला. मी पाकिस्तानची जर्सी घातली होती, पण माझ्या हातात भारताचा तिरंगा होता. आज मला सर्वजण देशद्रोही म्हणतायत, मी निर्दोष असल्याचं संयमचं म्हणणं आहे. 

क्रिकेटप्रेमींच्या तीव्र प्रतिक्रिया
संयम जयस्वालच्या फोटोवर क्रिकेटप्रेमींनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी तर त्याचे फोटो ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही भाजप नेत्यांना टॅग केले आहे. संयम जयस्वालविरोधात FIR दाखल करण्याची मागणीही काही जणांनी केली आहे. 

संयम जयस्वालचं स्पष्टीकरण
संयम जयस्वालच्याया कृत्यावर मोठ्याप्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर संयमने स्पष्टीकरण दिलं आहे. इतर करोडो क्रिकेटप्रेमींप्रमाणेच मीही भारतीय क्रिकेट संघाचा फॅन आहे. माझ्याकडून ते कृत्य चुकून झाल्याचे त्याने मान्य केलं आहे.