Ind vs Pak : शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर (Ind vs Pak) 5 विकेटने मात केली आणि संपूर्ण देशात एकच जल्लोष साजरा झाला. टी-20 वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा बदला अखेर भारतीय टीमने (Team India) एशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेत घेतलाच. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने एकदिवसीय सामन्यात विजयाचा श्रीगणेशा केला.
म्हणतात ना 'जो जीता वहिं सिकंदर'. भारताने या विजयाचं सर्वत्र कौतुक होतंय. पण पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला असला तरी एका खेळाडूची मात्र चांगलीच चर्चा रंगलीय.
तो खेळाडू आहे पाकिस्तानचा 19 वर्षांचा वेगवान गोलंदाज नसीम शाह. 'तो आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं' असं काहीसं नसीमबद्दल बोलता येईल. अगदी भारतीय क्रिकेट चाहत्यांनीही नसीमच्या कामगिरीचं कौतुक केलं. विशेष म्हणजे भारताविरुद्धचा हा सुपर प्रेशरचा सामना नसीमच्या पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता. याआधी नसीम पाकिस्तानसाठी एकदिवसीय आणि कसोटी सामना खेळला आहे.
पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या 148 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरली तेव्हा पाकिस्तानाचा कर्णधार बाबर आझमने नवख्या नसीम शाहच्या हाती चेंडू सोपवला. कर्णधाराने टाकलेला विश्वास नसीमने पहिल्याच षटकात सार्थ करुन दाखवला. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये नसीमने के एल राहुलची दांडी गुल केली.
त्यानंतर त्याने सूर्यकुमार यादवलाही पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. नसीमने 4 षटकात 27 धावा देत दोन महत्वाच्या विकेट घेतल्या. चौथ्या षटकात त्याच्या दुखापत झाली. पण त्याने माघार घेतली नाही, त्या परिस्थितीतही त्याने षटक पूर्ण केलं.
विराटसारखीच नसीमची कहाणी
नसीमला विराट कोहलीची विकेट घेता आली नाही, पण या दोघांमध्ये एक साधर्म्य आहे. विराट आणि नसीमची कहाणी काहीशी सारखीच आहे. दोघांच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात दु:खद झाली. 2006 मध्ये विराट कोहली दिल्ली संघाकडून रणजी क्रिकेट स्पर्धा खेळत होता. तेव्हा तो 17 वर्षांचा होता. कर्नाटकविरुद्धच्या एका सामन्यात तो खेळत असताना त्याच्या आयुष्यातली सर्वात वाईट घटना घडली. कोहलीच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आला आणि यातच त्यांचं निधन झालं.
कोहलीच्या घरी सांत्वनासाठी नातेवाईक येत होते, पण दिल्ली संघासाठी कोहली अशा परिस्थितीतही मैदानात पोहोचला. त्याने या सामन्यात 90 धावा केल्या. दिल्ली आणि कर्नाटक संघानेही त्याच्या धैर्याचं कौतुक केलं.
काहीसा असाच किक्सा नसीम शहाचाही आहे. 16 वर्षांचा असताना नसीमच्या आईचा मृत्यू झाला. त्याचवेळी नसीमने पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. आईचा मृत्यू झाला त्यावेळी नसीम ऑस्ट्रेलियात खेळत होता. दौऱ्यादरम्यान आईच्या मृत्यूची बातमी आली, पण नसीमने दौरा पूर्ण केला. त्यानंतर आईच्या अंत्यसंस्कारासाठी तो उपस्थित राहिला.
सोशल मीडियावर नसीम शाह ट्रेंड
रविवारच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर #INDvsPAK, #HardikPandya ट्रेंड होत असतानाच नसीम शाहने सोशल ट्रेंडवर आपली जागा बनवलीय. पाकिस्तानमध्ये नसीम शाह ट्रेंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पीसीबीने नसीमचा उल्लेख 'स्टार' म्हणून केला आहे.
Naseem Shah
That's It. That's the Tweet. pic.twitter.com/YqExMYh2As— Multan Sultans (@MultanSultans) August 28, 2022
हर्षा भोगले यांनीही केलं ट्विट
भारताचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही नसीम शाह याचं कौतुक करणार ट्विट केलं आहे. नसीम शाहमध्ये असं काही गुण आहेत जे फार कमी लोकांमध्ये असतात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो मॅच्युअर्ड दिसत नव्हता. पण आता तो परिपक्व झाला आहे. त्याच्याकडे नैसर्गिक आऊटस्विग आहे, पाकिस्तानने त्याला योग्य संधी दिली तर तो एक महान गोलंदाज म्हणून उदयास येईल असं हर्षा भोगले यांनी म्हटलं आहे.