India Vs Pakistan Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धा हळूहळू करून रंगतदार वळणावर येत आहे. आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तानसह सहा संघ सहभागी झाले आहेत. पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना भारताने 5 गडी राखून जिंकला. टी 20 वर्ल्डकपमधील पराभवाचा भारताने दहा महिन्यानंतर वचपा काढला. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींना एकच जल्लोष केला. असं असलं तरी भारत पाकिस्तान दोन्ही संघ या स्पर्धेत दोनदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. यासाठी दोन्ही संघांना असं समीकरण जुळवून आणावं लागेल.
आशिया कप 2022 स्पर्धेत एकूण सहा संघ आहेत. या सहा संघांना दोन गटात विभागलं गेलं आहे. 'अ' गटात भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग हे तीन संघ आहेत. तर 'ब' गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. 'अ' गटात भारत आणि पाकिस्तान संघ टॉपला राहिल्यास पुन्हा सामना होईल, हे निश्चित आहे. ग्रुप स्टेजनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 सप्टेंबरला दुसरा सामना पाहायला मिळेल.
सुपर 4 मध्येही संघ तीन-तीन सामने खेळतील. यापैकी दोन संघ अंतिम फेरीत स्थान मिळवतील. आशिया कप 2022 स्पर्धेतील अंतिम सामना 11 सप्टेंबरला खेळला जाईल. त्यामुळे या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा लढत होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत क्रीडाप्रेमींना दोन्ही संघातील रंगतदार सामने पाहायला मिळतील. त्याचबरोबर पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना जिंकल्याने भारताकडून क्रीडाप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.