मुंबई : तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर देशभरात METOO ही मोहीम सुरु झाली. याअंतगर्त अनेक बड्या सेलिब्रिटींनी त्यांच्यावरही अत्याचार झाल्याचे आरोप केले. फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोवर चार महिलांनी बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आता यामध्ये एका क्रिकेटपटूचं नावही समोर आलं आहे.
एका भारतीय एअर हॉस्टेसनं श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू अर्जुना रणतुंगावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केलाय. अर्जुना रणतुंगा हा सध्या श्रीलंका सरकारमध्ये मंत्री आहे. अर्जुना रणतुंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेनं १९९६ सालचा वर्ल्ड कप जिंकला होता.
अर्जुना रणतुंगावर आरोप करताना या एअर हॉस्टेसनं एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. एकदा भारत दौऱ्यावर आला असताना अर्जुना रणतुंगानं मला कंबरेकडून पकडलं. रणतुंगानं पकडल्यानंतर मी त्याच्या पायावर पाय मारला आणि आरडाओरडा सुरु केला. हॉटेलच्या रिसेप्शनवर जाऊन मी तक्रार केली पण हे तुमचं वैयक्तिक मत असल्याचं मला रिसेप्शनवर सांगण्यात आल्याचा दावा या एअर हॉस्टेसनं केला आहे.
एअर हॉस्टेसची फेसबूक पोस्ट
'माझी एक मैत्रिण मुंबईच्या जुहू भागतल्या सेंटॉर हॉटेलच्या लिफ्टजवळ भारतीय आणि श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंची सही घेण्यासाठी थांबली होती. मला तिच्या सुरक्षेची काळजी वाटत होती, म्हणून मीही तिच्याबरोबर गेले. आम्हाला पेय देऊ करण्यात आलं पण आम्ही नाही म्हणलो. ते ७ जणं होते आणि आम्ही २. त्यांनी दरवाजा आतून बंद केला. मी तिकडे अस्वस्थ होत होते म्हणून मी मैत्रिणीला हॉटेल रूममध्ये जायला सांगितलं.
तिला माझं न ऐकता स्विमिंग पूलजवळ जायचं होतं. त्यावेळी संध्याकाळचे ७ वाजले होते. पूलजवळ जाण्यासाठी हॉटेलच्या मागून अंधाऱ्या गल्लीतून जावं लागत होतं. माझ्या मैत्रिणीला शोधण्यासाठी मी मागे बघितलं पण ती आणि भारतीय क्रिकेटपटू नव्हते. रणतुंगानं मला कंबरेकडून पकडलं. मला त्यानं छातीजवळ चुकीच्या पद्धतीनं पकडलं. घाबरल्यामुळे मी ओरडायला लागले आणि त्याच्या पायावर पाय मारला.
मी रणतुंगाला त्याचा पासपोर्ट रद्द करण्याचा आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला, कारण तो श्रीलंकेचा नागरिक होता आणि एका भारतीय महिलेशी गैरवर्तन करत होता. हॉटेलच्या रिसेप्शनवर जाऊन मी तक्रार केली पण हे तुमचं वैयक्तिक मत असल्याचं मला रिसेप्शनवर सांगण्यात आलं.'
अर्जुना रणतुंगाच्या नेतृत्वात श्रीलंकेनं १९९६ सालचा वर्ल्ड कप जिंकला होता. लाहोरला झालेल्या फायनलमध्ये श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. रणतुंगानं १८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये ९३ टेस्टमध्ये ५,१०५ रन आणि २९६ वनडेमध्ये ७,४५६ रन केले होते.