मुंबई : 2017 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडियासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद इतका वाढला की कुंबळे यांना कोचपद सोडावं लागलं. विराट आणि अनिल कुंबळे यांच्या भांडणावर अनेक गोष्टींवर चर्चा होत होती. मात्र आता टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी या वादाचं कारण उघड केलंय.
टीम इंडियाचे माजी मॅनेजर रत्नाकर शेट्टी यांनी सांगितलं की, "विराट आणि कुंबळे यांच्यात बराच काळ वाद सुरू होता. विराट कोहलीला असं वाटलं की, अनिल कुंबळे आपल्या खेळाडूंसोबत उभे राहू शकत नाहीत आणि त्याच्या वागण्याने संघात तणावाचे वातावरण निर्माण झाले."
याच कारणामुळे अनिल कुंबळे यांना 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कुंबळे केवळ 1 वर्ष टीम इंडियाचे प्रशिक्षक होते.
वादावर रत्नाकर शेट्टी म्हणतात की, कुंबळे हे प्रशिक्षक म्हणून अनेकांना नापसंत होते आणि त्यांनी प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हावं अशी त्यांची इच्छा होती.
या प्रकरणाचा खुलासा करताना शेट्टी यांनी सांगितलं की, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर 2017 च्या आयपीएल दरम्यान त्याला भेटले होते. त्यानंतर सेहनागने त्यांना सांगितलं की डॉ. श्रीधर यांनी त्यांना प्रशिक्षकपदासाठी अर्ज पाठवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर तो हैदराबादमध्ये अनिल कुंबळे आणि विराट कोहलीसोबत सीओएच्या बैठकीत सहभागी झाला होता.