सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे मॅचमध्ये भोपळा न फोडू शकलेला भारताच्या अंबीती रायडूची बॉलिंग ऍक्शन वादात सापाडली आहे. अंबाती रायडुने दोन ओव्हर बॉलिंग केली. यात त्याने १३ रन्स दिले होते. या दरम्यान त्याच्या बॉलिंग ऍक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संपूर्ण प्रकाराचा अहवाल भारतीय टीम मॅनेजमेंटला पाठवण्यात आला आहे. या अहवालात रायडूच्या बॉलिंग अॅक्शन बद्दल चिंता व्यक्त केली आहे.
मोहम्म्द शमीच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडून जावं लागलं होतं. शमीच्या वाटच्या २ ओव्हर या रायडूने टाकल्या. त्याने २२ व्या आणि २४ व्या ओव्हरमध्ये बॉलिंग केली होती. त्यावेळी मैदानात ऑस्ट्रेलियाकडून शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा खेळत होते.
BREAKING NEWS: India's Ambati Rayudu has been reported for a suspect bowling action after the first #AUSvIND ODI. He is to undergo testing within 14 days.
➡️ https://t.co/oYme344WaJ pic.twitter.com/nJWMTkzTCb
— ICC (@ICC) January 13, 2019
आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार रायडूच्या बॉलिंग ऍक्शनवर नजर ठेवली जाणार आहे. तसंच येत्या १४ दिवसात रायडूला बॉलिंग ऍक्शनची चाचणीला तोंड द्यावे लागणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे या चाचणीचा निकाल येई पर्यंत रायडूला बॉलिंग करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण या निर्णयाचा भारतीय टीमला विशेष असा काही फरक पडणार नाही. रायडू ओळखला जातो तो त्याच्या बॅटींगसाठी. रायडूने आपल्या वनडे कारकिर्दीत आतापर्यंत ४६ मॅच खेळल्या आहेत. त्यात त्याने केवळ २०.१ इतक्याच ओव्हर टाकल्या आहेत. आणि ३ विकेट मिळवल्या आहेत.
क्रिकेमध्ये बॉलर्सच्या बॉलिंग ऍक्शनवरुन वाद निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी अशा अनेक बॉ़लर्सच्या ऍक्शनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. यात पाकिस्तानचा स्पिनर मोहम्मद हाफीज, सईद अजमल वेस्टइंडिजचा सुनील नारायण, श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि भारताच्या हरभजन सिंगच्या बॉलिंग ऍक्शनवरून वाद निर्माण झाले होते.