Hardik Pandya: सोमवारी राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 9 विकेट्सने दारूण पराभव झाला. आयपीएलच्या 38 व्या सामन्यात राजस्थानचा विजय झाला असून जवळपास या टीमने प्लेऑफचं तिकीट पटकावलं आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा हा पाचवा पराभव होता. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या सामन्यानंतरच्या पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये खूपच निराश दिसला.
यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी काही फारसा चांगला गेला नाही. या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीमचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला की, आपण सुरुवातीपासूनच स्वतःला संकटात टाकलं होतं. तिलक आणि नेहल यांची फलंदाजी चांगली होती. मला वाटत नाही की, आम्ही काही विकेट्स लवकर गमावल्यावर आम्ही 180 पर्यंत पोहोचू. असं असूनही आम्ही शेवट चांगला करू शकलो नाही. म्हणूनच आम्ही 10-15 रन्सने कमी पडलो.
हार्दिक पंड्या पुढे म्हणाला की, "या सामन्यात आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ केला असं मला वाटत नाही. आम्ही या गेममधून शिकू शकतो आणि आम्ही केलेल्या चुका सुधारू शकतो आणि आम्ही पुन्हा तेच करणार नाही याची खात्री करू शकतो. प्रगती खूप महत्वाची आहे. या सामन्यादरम्यान आम्ही ज्या काही चुका केल्या आहेत, त्यांचा स्वीकार करावा लागेल."
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 179 रन्स केले. त्याला प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने यंदाच्या आयपीएलचं पहिलं शतक झळकावलं. त्याने 59 चेंडूत शतक ठोकलं अन् जोरदार कमबॅक केलं. जयस्वालच्या या शतकीय खेळीमुळे आणि संदीप शर्माच्या धारदार गोलंदाजीमुळे राजस्थानला 9 विकेट्सने सामना जिंकता आला. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्ससाठी प्लेऑफ फक्त एक पाऊल लांब आहे.
मुंबई इंडियन्सला आणखी 6 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आता मुंबईला जर प्लेऑफ गाठायचं असेल तर उर्वरित 6 सामन्यांपैकी 5 सामने तरी जिंकावे लागणार आहेत. या 6 सामन्यांपैकी मुंबईला लखनऊविरुद्ध 2 आणि केकेआरविरुद्ध 2 सामने खेळायचे आहेत. तर तगड्या हैदराबादसोबत 1 सामना तर दिल्लीविरुद्ध देखील 1 सामना खेळायचा आहे. अशा परिस्थितीत मुंबईला हैदराबादचा सामना टफ जाण्याची शक्यता आहे.