मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद सुरु झालाय. कॅप्टन विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळेमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याची चर्चा आहे. कोच कुंबळे यांच्या कार्यपद्धतीवर कोहलीसह काही क्रिकेटपटू नाराज असल्याचं बोललं जातंय.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच्या दोन्ही प्रॅक्टिस मॅचेसच जिंकत टीम इंडियानं धडाक्यात सुरुवात केलीय. आता संपुर्ण क्रिकेटविश्वाला भारत विरुद्ध पाकिस्तान या मोस्ट अवेटेड मॅचची उत्सुकता लागलीय. मात्र, टीम इंडिया मिशन चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यापूर्वीच मैदानापेक्षा मैदानाबाहेरील घडामोडींसाठी अधिक चर्चेत आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली कोच अनिल कुंबळेच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. कोहलीनं आपली नाराजी थेट बीसीसीआयलाही कळवलीय. त्यामुळेच कदाचीत बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियासाठी नवा कोच शोधण्याची मोहिम सुरु केलीय. कुंबळेला चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर एक्स्टेन्शंन मिळणार नाही.
पहिल्या प्रॅक्टिस मॅचपूर्वी कोहलीला याबाबत पत्रकारांनी छेडलं असता. त्यानं बीसीसीआयची हीच काम करण्याची पद्धत असल्याचं म्हटलं होतं. तेव्हाच या चर्चांना अधिक उधाण आलं होतं. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या महत्वाच्या टुर्नामेंटदरम्यान, असा वाद निर्माण झाल्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीवर परिणाम व्हायला नको अशीच अपेक्षा भारतीय क्रिकेट फॅन्स करतायत.