मुंबई : टेस्ट क्रिकेटमध्ये नुकतंच पदार्पण केलेल्या अफगाणिस्तानने विक्रमाला गवसणी घातली आहे. बांगलादेशविरुद्धच्या टेस्टमध्ये अफगाणिस्तानचा २२४ रननी विजय झाला आहे. कर्णधार राशिद खान अफगाणिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. राशिदने पहिल्या इनिंगमध्ये ५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ६ विकेट घेतल्या. तर पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतकही केलं.
मागच्यावर्षी अफगाणिस्तानने भारताविरुद्धच्या मॅचमधून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर आयर्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये आणि आता बांगलादेशविरुद्ध अफगाणिस्तानचा विजय झाला. आतापर्यंत खेळलेल्या ३ टेस्टमध्ये अफगाणिस्तानने २ विजय मिळवले आहेत.
पहिल्या ३ टेस्ट मॅचमध्ये २ विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी अफगाणिस्तानने केली आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडची टीम आहे. इंग्लंडला २ विजय मिळवण्यासाठी ४ मॅचची गरज लागली होती. पहिले २ विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानला ९ मॅच, वेस्ट इंडिजला १२ मॅच, दक्षिण आफ्रिकेला १३ मॅच, श्रीलंकेला २० मॅच, भारताला ३० मॅच, झिम्बाब्वेला ३१ मॅच, न्यूझीलंडला ५५ आणि बांगलादेशला ६० मॅच लागल्या.
या मॅचमध्ये बांगलादेशच्या नावावरही नकोसा विक्रम झाला आहे. १० विरोधी टीमचा त्यांच्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये विजय झाला आहे.
अफगाणिस्तानने या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये ३४२ रन केले आणि मग बांगलादेशला २०५ रनवर ऑलआऊट केल्यामुळे अफगाणिस्तानला पहिल्या इनिंगमध्ये १३७ रनची आघाडी मिळाली. अफगाणिस्तानने यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये २६० रन केले, त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी ३९८ रनचं आव्हान मिळालं. अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा १७३ रनवर ऑलआऊट झाला.