मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया ७१ वर्षांच्या टेस्ट क्रिकेट इतिहासात पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकणार आहेत. या दोन्ही टीम ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये टेस्ट मॅच खेळतील. २८ नोव्हेंबरपासून भारतीय टीमच्या सराव सामन्याला सुरुवात होणार होती, पण पाऊस पडल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. २८ नोव्हेंबर याच दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटला सुरुवात झाली होती. २८ नोव्हेंबर १९४७ साली ब्रिस्बेनमध्ये पहिली मॅच खेळवण्यात आली होती.
स्वातंत्र्याच्याआधी भारत फक्त इंग्लंडविरुद्ध क्रिकेट खेळायचा. भारत इंग्लंडविरुद्ध १९३२ साली लॉर्ड्सच्या मैदानात पहिली टेस्ट खेळला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये १९४६ पर्यंत १० टेस्ट मॅच झाल्या. यातल्या ६ मॅच इंग्लंडनं जिंकल्या तर ४ मॅच ड्रॉ झाल्या. पण स्वातंत्र्यानंतर भारतानं पहिली टेस्ट सीरिज इंग्लंडऐवजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली. भारतीय टीम ५ टेस्ट मॅचची सीरिज खेळण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाला गेली.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिली टेस्ट २८ नोव्हेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरु झाली. भारतीय टीमचे कर्णधार लाला अमरनाथ तर ऑस्ट्रेलियाचे कर्णधार डॉन ब्रॅडमन होते. या मॅचमध्ये डॉन ब्रॅडमन यांनी १८५ रन केले. ऑस्ट्रेलियानं त्यांची पहिली इनिंग ३८२/८ वर घोषित केली. यानंतर भारतीय बॅट्समननी ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगसमोर लोटांगण घातलं. भारताची पहिली इनिंग ५८ रनवर आणि दुसरी इनिंग ९८ रनवर ऑल आऊट झाली.
भारतीय टीमला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी या मॅचमध्ये लाला अमरनाथ यांनी ऑलराऊंड कामगिरी केली. अमरनाथ यांनी ऑस्ट्रेलियाच्या ४ विकेट घेतल्या. यामध्ये ब्रॅडमन यांच्या विकेटचाही समावेश आहे. त्या मॅचमध्ये ब्रॅडमन हिट विकेट आऊट झाले होते. ब्रॅडमन त्यांच्या कारकिर्दीमध्ये फक्त एकदाच हिट विकेट आऊट झाले होते. यानंतर अमरनाथ यांनी भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये सर्वाधिक २२ रन बनवले होते. पण दुसऱ्या इनिंगमध्ये ते फक्त ५ रन करून आऊट झाले.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत १२८ टेस्ट मॅच खेळवण्यात आल्या आहेत. यातल्या ७३ मॅच ऑस्ट्रेलियानं आणि ४५ मॅच भारतानं जिंकल्या आहेत. तर २६ टेस्ट मॅच ड्रॉ झाल्या आणि १ टेस्ट ड्रॉ झाली. दोन्ही देशांनी ऑस्ट्रेलियात ४५ टेस्ट मॅच खेळल्या. यातल्या ५ टेस्ट मॅचमध्ये भारताचा तर २८ टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.