भारतीय टीमच्या प्रशिक्षकपदासाठी २० खेळाडूंचे अर्ज

भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी २० खेळाडूंनी बीसीसीआयकडे अर्ज केले आहेत.

Updated: Aug 9, 2018, 08:00 PM IST
भारतीय टीमच्या प्रशिक्षकपदासाठी २० खेळाडूंचे अर्ज title=

मुंबई : भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी २० खेळाडूंनी बीसीसीआयकडे अर्ज केले आहेत. यामध्ये भारताचे माजी स्पिनर सुनील जोशी आणि रमेश पोवार यांच्यासह न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूचाही समावेश आहे. भारताचा माजी विकेट कीपर अजय रात्रा, विजय यादव, माजी महिला कर्णधार ममता माबेन आणि सुमन शर्मा यांनीही या पदासाठी अर्ज केले आहेत. सुमन यांनी याआधी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. पूर्णिमा राव प्रशिक्षक असताना सुमन सहाय्यक प्रशिक्षक होत्या. न्यूझीलंडची मारिया फाये हिनंही प्रशिक्षक होण्यासाठी इच्छुक आहे. फायेनं न्यूझीलंडसाठी २ टेस्ट आणि ५४ वनडे खेळल्या आहेत. ३४ वर्षांची मारिया फाये सध्या गुंटूरमध्ये एसीए अॅकेडमीमध्ये प्रशिक्षण देत आहे. 

सुनील जोशी आणि रमेश पोवार या दोघांमध्ये भारतीय महिला टीमचं प्रशिक्षक होण्यामध्ये मुख्य स्पर्धा आहे. रमेश पोवार भारताकडून २ टेस्ट आणि ३१ वनडे खेळला आहे. तुषार अरोठेंना वादग्रस्त पद्धतीनं प्रशिक्षकपदावरून हटवल्यानंतर रमेश पोवार भारतीय टीमचा अंतरिम प्रशिक्षक आहे.

सुनील जोशी यांनी भारताकडून १५ टेस्ट आणि ६९ वनडे खेळल्या आहेत. सुनील जोशी नुकतेच ओमान आणि बांगलादेशचे प्रशिक्षक होते. १६० प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव असेलल्या सुनील जोशींनी जम्मू काश्मीर, हैदराबाद आणि आसामच्या टीमचंही प्रशिक्षकपद भुषावलं आहे. 

या सगळ्या उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी होणार आहेत. सीओए सदस्य डायना एडुल्जी, बीसीसीआयचे क्रिकेट व्यवस्थापक सबा करीम आणि कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी या उमेदवारांच्या मुलाखती घेतील.

भारतीय महिला टीममधल्या ज्येष्ठ खेळाडूंसोबत मतभेद झाल्यामुळे तुषार अरोठे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर बीसीसीआयनं प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते. वर्ल्ड कप फायनलच्या वर्षानंतर अरोठे आणि महिला क्रिकेटपटूंमधला वाद समोर आला.