Parijat Plant Vastu Direction: पारिजातकाचे फुलं सुंदर असतात. झाडाखाली फुलांचा सडा पडलेला पाहूनच मन प्रसन्न होते. मात्र, अनेक ठिकाणी घरसमोर पारिजातकाचे झाड नसावे असं सांगितले जाते. पण खरंच त्यात तथ्य आहे का. शास्त्रात पारिजातकाच्या झाडाबाबत अनेक मान्यता सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रात पारिजातकाचे झाड घरासमोर लावावे की नाही? याबाबत काय सांगितले आहे. हे जाणून घेऊया.
पारिजातकाची फुलांचा गंध मंद आणि मनमोहक असतो. असं म्हणतात जिथे पारिजातकाचे झाड असते तिथले लोक निरोगी आणि दीर्घायुषी असतात. पारिजातकाच्या फुलांना प्राजक्ताचे फुल, हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशा अनेक नावांनी ओळखले जाते. पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि नाजूक केसरी देढ पाहूनच मन प्रफुल्लीत होते. पारिजातकाच्या झाडामागे एक आख्यायिकाही सांगितली जाते.
पारिजातकाचे झाड कृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवर आणले. पण हे झाड कुठे लावावे यासाठी सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाले. पण कृष्णाने शक्कल लढवली अन् हे झाड सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील. याचप्रसंगामुळं पारिजातकाच्या झाडाविषयी एक म्हण रुजू झाली आहे. ती म्हणजे, पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात.
घरात पारिजातकाचे झाड लावणे शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला पारिजातकाचे फुल अत्यंत प्रिय आहे. जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तिथे देवी लक्ष्मी वास करतात, असं म्हणतात. प्राजक्ताची फुले रात्री उमलतात आणि पहाटे खाली पडतात. त्यामुळं लक्ष्मी देवीच्या पुजेला स्वतःहून खाली पडलेली फुलेच अर्पण केली जातात.
प्राजक्ताच्या फुलांचा सुवास मनमोहक असतो त्यामुळं घरात किंवा दारासमोर प्राजक्ताचे झाड असल्यास या सुवासाने आपोआप तणाव दूर होतो. तसंच, मनाला शांतीदेखील मिळते.
ज्यांच्या घराच्या आजूबाजूला पारिजातकाचे झाड असते त्यांच्या घरातील वास्तुदोष दूर होतात. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहते तसंच दीर्घायुष्य प्राप्त होते.
आयुर्वेदेताही पारिजातकाच्या झाडाला व फुलांचा उल्लेख आढळतो. पारिजातकाच्या फुलांपासून पानं, साली आणि बियाणंदेखील उपयुक्त असते. पारिजातकाच्या फुलांचा चहादेखील बनवून प्यायला जातो. हृदयविकारांवर रामबाण उपाय आहे. मात्र, याचा वापर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यापासून करावा.
घरामध्ये पारिजात रोप लावण्यासाठी वास्तुशास्त्रात दिशा सांगितली आहे. नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी घरात प्राजक्ताचे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )