घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने धूप बनविण्याची सोपी पद्धत

बाजारात मिळणारं धूपामध्ये बऱ्याचदा भेसळ असते. त्यामुळे अस्सल नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं धूप मिळणं खूपच कठीण होतं. म्हणूनच कोणत्याही केमिकलशिवाय घरच्या घरी धूप कसं बनवावं हे जाणून घेऊयात.    

Updated: Jun 11, 2024, 01:34 PM IST
घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने धूप बनविण्याची सोपी पद्धत  title=

हिंदू धर्मात देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी धूप दाखवलं जातं. धार्मिक दृष्ट्या धूपाचं जितकं महत्त्व आहे तेवढंच आयुर्वेदातही धूप महत्त्वाचं मानलं जातं. धूपामुळे आजूबाजूची हवा शुद्ध होण्यास मदत होते. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात बऱ्याचदा नैराश्यामुळे मानसिक आरोग्य खराब होते. चिंता ताण तणाव दूर करण्यासाठी प्राणायाम  फायदेशीर ठरतो, त्याचप्रमाणे धूप सुवासाने देशील मानसिक स्वास्थ संतुलित राहण्यास मदत होते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे धूप आणि कापूरच्या वासाने मानसिक ताण तणाव कमी होण्यासाठी मदत होते. मात्र आजकाल बाजारात मिळणारं धूप हे हलक्या प्रतिचं किंवा केमिकलयुक्त असतं. त्यामुळे श्वसनाचा आजार होण्याचं प्रमाणही वाढतं.  

धूप बनविण्याची कृती 

बाजारातील केमिकलयुक्त धूप वापरण्यापेक्षा तुम्ही  नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी धूप तयार करु शकता. रोजच्या पुजेसाठी वापरलेली फुलं दुसऱ्या दिवशी निर्माल्य म्हणून फेकून दिली जातात. असं न करता ही फुलं सुकवावी. सुकलेली फुलं, नारळाची किशी, लवंग , दालचिनी आणि भिमसेनी कापूर यांचं बारीक मिश्रण करुन घ्यावं. गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या जंतूनाशक म्हटल्या जातात. शेणाच्या गोवऱ्या त्यात गायीचं तूप आणि बारीक केलेलं मिश्रण एकत्रित करुन त्याचे छोटे गोळे करुन घ्यावेत. तयार झालेलं धूप हे नैसर्गिक असल्याने सकाळ संध्याकाळ दिवा लावताना जाळल्याने घरातील हवा शुद्ध राहण्यास मदत होते. 

 हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हटलं जात असून तिची देवासमान पुजा केली जाते. गायीच्या दुधाप्रमाणेच तिचं शेणं ही तितकच फायदेशीर मानलं जातं. गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या जाळल्याने घरात जीवजंतूचा शिरकाव होत नाही. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने घरच्या घरी धूप बनविण्यासाठी तुम्ही शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करु शकता.