Mahashivratri 2023 Shubh Muhurat: महाशिवरात्री 18 फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे. या महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) उत्सवाच्या दरम्यान, अत्यंत दुर्मिळ योग जुळून आलाय. ज्योतिषशास्त्रानुसार, 13 फेब्रुवारीला सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला, त्यानंतर 15 फेब्रुवारीला शुक्र देव मीन राशीत दाखल झाला आहे. त्यामुळे शंकराची पुजा (Lord Shiva) केल्याने त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे.
शिवपुराणाच्या कथेनुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि भगवान विष्णू आणि ब्रहराजी यांनी प्रथम शिवलिंगाची पूजा केली. तर दुसऱ्या कथेनुसार महाशिवरात्रीच्या तिथीला देवी पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी झाला होता, अशी मान्यता आहे.
महाशिवरात्रीला दिवस रात्र शंकराची पूजा करता येते. महाशिवरात्रीला रात्रीच्या चार तासांत भगवान शंकराची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. ज्यामध्ये रात्रीच्या आठव्या मुहूर्तात निशिथकाल ही पूजा उत्तम आहे, असं ज्योषिशशास्त्रानुसार मानलं जातं.
यंदाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी एक अतिशय शुभ योगायोग घडणार आहे. या वेळी महाशिवरात्रीला केदार, शंख, षष्ठ, ज्येष्ठ आणि सर्वार्थ सिद्धयोग मिळून पंचमहायोग होत आहे. 700 वर्षांनंतर असा मुहूर्त घडतो, असं मानलं जातंय.