Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. 19 सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2023 Date) सुरूवात आहे. मोठमोठ्या सार्वजनिक मंडळांचा एक आठवड्याआधीच मोठ्या धुमधडाक्यात बाप्पाच्या आगमनाचा सोहळा झाला. तर, 19 तारखेला मोठ्या उत्साहात घरा घरात बाप्पा विराजमान होणार आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी घरातील सारेच उत्सुक असतात. आता 10 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केली. बाप्पाच्या आगमनाने भक्तांची दुखः दूर होतात. मात्र घरात बाप्पाची मूर्ती आणताना व स्थापन करताना काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
19 सप्टेंबरला बाप्पाचे आगमन होत असून अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसरर्जन पार पडते. काही ठिकाणी दीड, पाच, सात दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले जाते. तर, हल्ली पर्यावरण पूरक बाप्पा घरी आणला जातो. शाडूच्या मातीपासून घडवलेला बाप्पा आणावा, असं आवाहन करता येते. याशिवाय काही ठिकाणी सोने, चांदी, तांबे या धातूंच्या मूर्तीचीही स्थापना करु शकता. पण बाप्पाची स्थापना कुठे करावी त्याबाबत वास्तू शास्त्राचे काही नियम आहेत. ते जाणून घ्या.
गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्याआधी कोणत्या दिशेला असावी, याची माहिती करुन घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार, बाप्पाची मूर्ती पूर्व-पश्चिम दिशेला स्थापन करणे शुभ मानलं जाते. घरातील ईशान्य भागात म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेच्यामध्ये बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करु शकतात. मात्र, दक्षिण दिशेला बाप्पाची मूर्ती स्थापन करणे अशुभ मानले जाते. बाप्पाचे मुख दक्षिण दिशेला ठेवल्यास पुजेचे फळ मिळत नाही.
वास्तुनुसार, गणपती बाप्पाची स्थापना करताना पाटावर लाल कपडा ठेवणे शुभ मानले जाते. तसंच, बाप्पाची स्थापना बाथरुम, टॉयलेटच्या भिंतीजवळ कधीच करु नये. घरातील बेडरुममध्येही गणपतीची स्थापना करणे अशुभ मानले जाते.
बाप्पा घरी आणताना मूर्ती कशी असावी हे देखील शास्त्रात सांगण्यात आले आहे. नेहमी बाप्पाची बैठी मूर्तीच घरी आणावी तसंच, डाव्या सोंडेच्या गणपतीला वामुखी गणपती म्हणतात डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे सोपे असतं. डाव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा केल्यास धन, करिअर, व्यवसाय, संतान सुख, वैवाहिक सुख इत्यादींशी संबंधित सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
मात्र, उजव्या सोंडेच्या गणपतीसाठी खूप सोवळं पाळावं लागतं. तसंच, उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे पाळले नाहीतर बाप्पाचा कोप होण्याची शक्यता असते. उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात. ज्याची पूजा केल्याने भक्ताला त्याच्या शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
वास्तू शास्त्रानुसार, एकापेक्षा अधिक गणेशमूर्ती स्थापन करु नका. त्यामुळं घरात नकारात्मकता निर्माण होते. तसंच, बाप्पाची मूर्ती ज्या ठिकाणी स्थापन करत आहात तिथे प्रकाश पोहोचतोय का याची खात्री करा. अंधाऱ्या खोलीत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करु नका, त्यामुळंही घरात नकारात्मकता निर्माण होऊ शकते.
बाप्पाच्या मूर्तीची निवड करताना लक्षात ठेवा की, बाप्पाचे वाहन मूशक असेल व त्याच्या एका हातात मोदक असेल. कारण दोन्हीही बाप्पासाठी अतिप्रिय आहेत. त्याचबरोबर, बाप्पाची नेहमी सिंहासनावर विराजमान झालेली किंवा बैठी मूर्तीच घरी आणावी. यामुळं घरात सुख-शांती नांदते, कार्यात गती मिळते. बाप्पा उभे असलेली मूर्ती कधीच घरात स्थापन करु नका, अशीही एक धार्मिक मान्यता आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )