धनत्रयोदशी विशेष - ... म्हणून आज यमदीप दान केले जाते

वसुबारसपासून दीपोत्सवाला सुरूवात झाली आहे. 

Updated: Oct 17, 2017, 09:17 AM IST
धनत्रयोदशी विशेष - ... म्हणून आज यमदीप दान केले जाते  title=

मुंबई : वसुबारसपासून दीपोत्सवाला सुरूवात झाली आहे. 

आज सर्वत्र धनत्रयोदशीचा सण साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीच्यादिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते. सोबतच या दिवशी आरोग्यरक्षणाची देवता धन्वंतरीचीही पूजा केली जाते. पण धनत्रयोदशीच्या दिवशी दीप दान करण्याचीही प्रथा आहे.  
धनत्रयोदशीच्या दिवशी दीप दान करण्यामागील प्रथेचे महत्त्व प्रसिद्ध पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. 

आज (१७ ऑक्टोबर) रात्री १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत आश्विन कृष्ण त्रयोदशी आहे. आज प्रदोषकाली सायंकाळ ६.१३ पासून रात्री ८.४१ पर्यंत दीप दान करू शकता.  दीपदानाबरोबरच गरजूंना , गरीबाना  वस्त्रदान, अन्नदानही केले जाऊ शकते. आज कोणत्याही प्रकारचे दान केल्यास घरात अपमृत्यू होत नाही असे यमराजाने यमदूतांना सांगितले आहे. यासाठी विशेष विधी नाही. दिलेल्या दानाची कुठे वाच्यता करावयाची नाही.

काय आहे पुराणातील कथा ? 

 एकदा यमराजाने यमदूताना विचारले की " तुम्ही जेव्हा एखाद्याने प्राण हरण करता त्यावेळी तुम्हाला काय वाटते ?"
     यमदूत म्हणाले "वयस्कर माणसाचे प्राण हरण करताना दु: ख होतेच परंतु जेव्हा एखाद्या बालकाचे प्राण हरण करतो. त्यावेळेस होणारा आकांत पाहून खूपच वाईट वाटते. यांवर काहीतरी उपाय सांगा."
यमराज म्हणाले, " जो कोणी धनत्रयोदशीच्या दिवशी दीपदान करील त्याच्या घरात बालमृत्यू होणार नाही."

तात्पर्य - गरीबांना दीपावली साजरी करता यावी यासाठी हे सांगितलेले आहे. दिवे, नवीन वस्त्र, गोड पदार्थ दान मदत म्हणून मिळाले तर गरीबही दिवाळी साजरी करू शकतील. लोकांनी दान द्यावे यासाठी हे सांगितलेले आहे.  

नक्की जाणून घ्या उद्याच्या अभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी कसे बनवाल सुगंधी उटणं