Deep Amavasya 2024 : कशी कराल घरातील सर्व दिव्यांची पूजा?; कणकेच्या गोड दिव्यांना खास महत्त्व

Deep Amavasya 2024 : श्रावण सुरु होण्याच्या पूर्वी येणाऱ्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हटलं जातं. यादिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते. त्यांना खास कणकेच्या दिव्याने ओवाळलं जातं. 

नेहा चौधरी | Updated: Aug 3, 2024, 02:50 PM IST
Deep Amavasya 2024 : कशी कराल घरातील सर्व दिव्यांची पूजा?; कणकेच्या गोड दिव्यांना खास महत्त्व  title=
Deep Amavasya diva puja methods puja vidhi How to make sweet diva from dough recipe in marathi

Deep Amavasya 2024 : हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. आषाढ अमावस्या ही अतिशय खास असून त्याचा दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. या अमावस्येला महाराष्ट्रात आषाढी अमावस्या (Ashadha Amavasya 2024) आणि दीप अमावस्या ( Deep Amavasya 2024) या नावाने ओळखली जाते. त्यासोबत या अमावस्येला महाराष्ट्रात गटारी म्हणजे गतहारी अमावस्या म्हणूनही हाक मारली जाते. तर गुजरातमध्ये हरियाली अमावस्या ( Hariyali Amavasya 2024) , कर्नाटकात भीमाना अमावस्या (Bhimana Amavasya 2024) तर आंध्रप्रदेशात चुकाला अमावस्या असं म्हटलं जातं. (Deep Amavasya diva puja methods puja vidhi How to make sweet diva from dough recipe in marathi)

दीप अमावस्येचा शुभ मुहूर्त 

पंचांगानुसार अमावस्या तिथी शनिवारी 3 ऑगस्टला दुपारी 03.50 मिनिटांपासून रविवारी 4 ऑगस्टला दुपारी 4.42 मिनिटांपर्यंत असणार आहे. धर्मशास्त्रात उदय तिथीनुसार सण साजरे करण्यात येतात. त्यानुसार 4 ऑगस्टला दीप अमावस्या साजरी करण्यात येणार आहे. 

अशी करा दिव्यांची पूजा!

दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्येला घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करुन त्यांची पूजा केली जाते. ही पूजा एका खास पद्धतीने केली जाते. असं मानलं जातं की यादिवशी दिव्यांना आराम द्यायचा असतो. यादिवशी कणकेच्या गोड दिव्यांनी या घरातील दिव्यांची पूजा करण्यात येते. दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो. म्हणजे तो नकारात्मक उर्जेतून सकारात्मक उर्जेकडे नेतो. त्यामुळे हिंदू धर्मात दिव्याला अतिशय महत्त्व असून त्याला मांगल्य आणि शुभ कार्याचं प्रतिक मानलं जातं. 

दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर, घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करुन ते नीट स्वच्छ करा. आता हे दिवे सुती कापडाने चांगले पुसून घ्या. त्यानंतर, तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्याभोवती सुंदर रांगोळी काढून काढा. आता या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र घाला आणि त्यावर दिव्यांची मांडणी करा. आता या दिव्यांवर हळदी-कुंकू आणि फुलं वाहून पूजा करा. त्यानंतर, हे दिवे प्रज्वलीत करा आणि कणिकेच्या दिव्याने औक्षण करा. त्यानंतर, देवाला दुध-साखरेचा नैवेद्य दाखवावा.

पूजा झाल्यानंतर 'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥', या मंत्राचा जप करा. या मंत्रा अर्थ असा आहे की,  हे दीपदेवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा आहे. 

हेसुद्धा वाचा - Deep Amavasya 2024 : ....म्हणून दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळावे! जाणून घ्या शास्त्र

कणकेचे गोड दिवे कसे बनवावे?

साहित्य 

गव्हाचे पीठ एक कप

रवा दोन टेबलस्पून

अर्धी वाटी गूळ

चवीपुरतं मीठ आणि तेल

कृती 

कढईत पाणी गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये आपण घेतलेल्या प्रमाणात गुळ घाला. पाण्यात गूळ पुर्णपणे वितळवून थंड झाल्यानंतर त्यात दोन कप गव्हाचे पीठ, दोन चमचे रवा मिक्स करा. मीठ आणि दोन चमचे तेल घाला. लागेल तसे पाणी वापरून हे घट्ट पीठ मळून घ्या. त्यानंतर झाकून पंधरा मिनिटं ठेवा. आता या तयार पिठाचे छोटे गोळे करून त्याला दिव्यांचा आकार द्या. आता हे दिवे वाफेवर उकडून घ्या. 10 मिनिट गरम वाफेवर ठेवल्याने दिवे पटकन उकडले जातात. त्यानंतर दिव्यांमध्ये तूप आणि वाती घालून हे दिवे प्रज्वलित करा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)