Ayodhya Ram Mandir Why The Temple Will Be Inaugurated on January 22: अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा मागील काही दिवसांपासून अनेकदा अयोध्येला जाऊन सुरु असलेल्या कामाची पहाणी करत आहेत. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच देशभरातील सर्वसामन्य नागरिक आणि हजारोंच्या संख्येनं अती महत्त्वाचे लोक सहभागी होणार आहेत. यज्ञ, अध्यात्मिक विधी आणि पुरोहितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. अनेक क्रिकेटपटू आणि चित्रपट कलाकारही या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत.
अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अवघ्या 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त काढण्यात आला आहे. हा शुभ मुहूर्त 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटं आणि 8 सेकंदांपासून दुपारी 12 वाजून 30 मिनिटं 31 सेकंदांपर्यंत असणार आहे. अशावेळेस अनेकांच्या मनात असा प्रश्न उपस्थित राहिला आहे की रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यासाठी हाच वेळ का निवडण्यात आला आहे? या मागील खरं कारण जाणून घेऊयात...
हिंदू पुराण कथांप्रमाणे, भगवान रामाचा जन्म अभिजीत मुहूर्तावर मृगशीर्ष नक्षत्र, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगच्या संगमावर झाला. हे सारे शुभ योग 22 जानेवारी 2024 रोजी पुन्हा एकदा जुळून येत आहेत. त्यामुळेच अयोध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जात आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने 22 जानेवारी रोजी शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. 22 जानेवारी हा ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार आदित्यनाथ यांनी, "22 जानेवारी रोजी श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 'राष्ट्रीय सण' आहे. या कार्यक्रमाशी सर्वसामान्य जनता भावनात्मक पद्धतीने जोडले गेले आहेत. या दिवशी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी असेल. सर्व मद्यविक्रीची दुकानं बंद असतील," असं सांगितलं.
राम मंदिर सोहळ्याचे कार्यक्रम उत्तर प्रदेशमध्ये 16 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत होणार आहेत. अयोध्येमध्ये 16 तारखेला रामलल्ला पूजनाने सोहळ्याची सुरुवात होईल. त्यानंतर 17 जानेवारी रोजी श्रीविग्रह परिसर भ्रमण केलं जाईल. तसेच गर्भगृह शुद्धिकरण केलं जाईल. त्यानंतर 18 जानेवारीपासून अधिवास प्रारंभ होईल. यामध्ये सकाळीआणि संध्याकाळी जलाधिवास, सुगंध आणि गंधाधिवास सारख्या गोष्टी केल्या जातील. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी फळ अधिवास आणि धान्य अधिवास केला जाईल. 20 जानेवारी 21 जानेवारी रोजी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 22 जानेवारी रोजी दिवसाच्या मध्यावर असताना रामलल्लाच्या डोळ्यांवरुन पट्टी काढून त्यांना आरसा दाखवला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.