अनाथांच्या ममतेचा सिंधु सागर हरपला; पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे दुर्दैवी निधन

अनाथांचे ममता बाल सदन झाले पुन्हा अनाथ    

Updated: Jan 4, 2022, 11:35 PM IST
अनाथांच्या ममतेचा सिंधु सागर हरपला; पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे दुर्दैवी निधन title=

पुणे : आपल्या सामाजिक कार्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जागतिक पातळीवर गाजविणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

सिंधुताई यांना प्रकृती अस्वाथामुळे २४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ नोव्हेंबरला शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कमी अधिक सुधारणा होत होती. त्यांनतर गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.   

पुण्यातील मांजरी येथे सकाळी ८ वाजल्यापासून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महानुभाव पंथाच्या त्या अनुयायी असल्याने दुपारी १२ वाजता ठोसर बागेत दफनविधी करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण गावात ममता बाल सदन संस्था सुरु केली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.

सिंधुताई यांनी स्थापन केलेल्या समकक्ष संस्था
बाल निकेतन हडपसर, पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह ,  चिखलदरा
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
ममता बाल सदन, सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

सिंधुताईंना मिळालेले पुरस्कार 
- पद्मश्री पुरस्कार (२०२१) 
- महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)
- पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)
- महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)
- मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
- आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
- सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
- राजाई पुरस्कार
- शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
- सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)
- सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).
- २००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)
- डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)
- पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार'