पुणे : अनेक तळीराम वाईन शॉपमधून दारु घेऊन उघड्यावर किंवा रस्त्याच्या बाजूच्या कोपऱ्यात उभे राहून दारु रिचवतात. या सर्व प्रकारातून गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकाराचा त्रास होत असल्याने पुणेकराने पुणेरी स्टाईलने सरकारला पत्र लिहिलं. (pune social activitist sachin dhanakude from sought information under rti to get information on suitable and approved places for drinking alcohol)
तळीरामांसाठी दारु पिण्यासाठी अधिकृत जागा कोणती, याबाबतची माहिती आरटीआयद्वारे मागवली. त्या पत्रात सरकारने दिलेलं उत्तरही दिलं. त्यानंतर या सामाजिक कार्यकर्त्याने सरकारला लिहिलेल्या पत्राचं आणि त्यावर मिळालेल्या पत्राचं उत्तर भलंमोठ बॅनर काढून त्याचा रथ काढला.
या रथावर विविध दारु, बिअरच्या रिकाम्या बाटल्या लटकवल्या आहेत. या सर्व प्रकाराने पुणेकराचं लक्ष वेधून घेतलं आहे. इतकंच नाहीतर, या सामजिक कार्यकर्त्याने दारु तसेच दूध पिण्यासाठी बसण्याची सोयही केली आहे.
दारुडे मनाला वाटेल तिथे दारु प्यायला बसतात. त्यांच्या मुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे या सो कॉल्ड अर्थव्यवस्थेच्या कण्याला म्हणजेच तळीरामांसाठी पिण्याची अधिकृत जागा कोणती, अशा जागांची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन धनकुडे यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवली.
उत्तर काय मिळालं?
"मद्यसेवन परवाने हे वैयक्तिरित्या मद्य सेवनासाठी देण्यात येतात. मात्र मद्यसेवन कोणत्या ठिकाणी करायचं, याबाबत नियमात कोणताही उल्लेख नाही", असं उत्तर देण्यात आलं.
सरकारकडून देण्यात आलेलं उत्तर हे बेफिकरीचं आहे", अशा शब्दात सचिन धनकुडे यांनी नाराजी व्यक्त केली.
"उघड्यावर दारु पिणाऱ्यांची समस्या ही सर्वत्र आहे. उघड्यावर दारु पिणाऱ्यांसाठी काहीच बंधन किवा नियम नाहीत. या मुद्द्यावरुन मी सरकारकडून माहितीच्या अधिकारात दारु पिण्यास योग्य आणि मान्यता प्राप्त ठिकाणांची माहिती मागितली", असं धनकुडे म्हणाले.
सरकारचं उत्तर
"मद्य सेवन कोणत्या ठिकाणी करावं याबाबत नियमांमध्ये कोणताही उल्लेख नाही", असं उत्तर माहितीच्या अधिकारात देण्यात आलं.
सरकारच्या उत्तरावर धनकुडे काय म्हणाले?
"आता दारु कुठे प्यावी, याबाबत कायद्यात काहीही उल्लेख नाही. त्यामुळे उद्या आम्ही रस्त्यावर दारु पिणाऱ्यांना रोखलं, तर ते आम्हाला म्हणतील की कायद्यात तशी नोंद नाही," असं म्हणत तळीराम याचा गैरफायदा घेतील, अशी भिती धनकुडे यांनी व्यक्त केली.
सरकारला आवाहन
"रस्त्याच्या बाजूला दारु पिणाऱ्यांवर वेसन घाला. यांना कायद्याच्या चौकटीत आणा", असं आवाहन धनकुडे यांनी सरकारला केलं आहे.
'बसण्याची' सोय
दारुसाठी पैसे कुठून आणायचे यापेक्षा बसायचं कुठं हा सर्वात मोठा प्रश्न पिणाऱ्यांसमोर असतो. मात्र धनकुडे यांनी दारु आणि दूध पिण्यासाठी खास व्यवस्थाही केली आहे. लक्षात घेण्याची बाब अशी की धनकुडे यांनी ही उपाहासात्मक पद्धतीने ही सोय केली आहे.
दरम्यान रस्त्यावर कुठे प्यायची, याबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नसली, तरी यावर लवकरात लवकर नियम करण्यात यावं, अशी मागणी सर्वसामांन्याकडून करण्यात येत आहे.