पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका व्यक्तीच्या घरात स्फोटकांचा साठा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राजाराम अभंग असे या व्यक्तीचे नाव असून रात्री उशीरा पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी राजाराम अभंग याच्याकडे अशीच काही स्फोटके आढळून आली होती. त्याने यापूर्वी बॉम्बस्फोट घडवून एका व्यक्तीला जीवे मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता. मंगळवारी पुन्हा राजाराम याच्या घरावर पोलिसांनी छापा मारला असता इलेक्ट्रिक गन, पाईप बॉम्ब, तलवार, कोयता, भाले, बॉम्ब बनवण्यासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रिक उपकरणे आदी स्फोटके आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला.
ही माहिती मिळाल्यानंतर शहरातील पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ग्रामीण भागात स्फोटकांचा साठा आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
#Maharashtra: Pune Rural Police have arrested a person with explosives and some detonators used to make bomb from Pimpalwadi village of Pune district. Gun powder, explosives powder, 59 detonators have been recovered from the accused. pic.twitter.com/IgoVmFgjTT
— ANI (@ANI) April 3, 2019
अभंग हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून यापूर्वी त्याने २००३ साली त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एकाला ठार मारण्याच्या उद्देशाने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात काही लोक जखमी झाले होते. याप्रकरणी तो तीन वर्षे येरवडा कारागृहात कैदेत होता. पुणे ग्रामीण पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.