नाराज वसंत मोरे म्हणाले... राजमार्ग सोडणार नाही, पण खंत कायम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत काढलेल्या आदेशाला आव्हान देणारे मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केलीय. 

Updated: May 6, 2022, 01:10 PM IST
नाराज वसंत मोरे म्हणाले... राजमार्ग सोडणार नाही, पण खंत कायम title=

पुणे : राज ठाकरे ( Raj thackarey ) यांची औरंगाबाद येथे मैदानावर सभा होण्यापूर्वी पुण्यात मुक्काम केला होता. या मुक्कामादरम्यान मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे अनुपस्थित होते. 

वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या भोंगा निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर त्यांची शहर अध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली. तसेच, राज ठाकरे यांनी मोरे यांची भूमिका समजून घेण्यासाठी त्यांना शिवतीर्थ येथे बोलावले होते.

शिवतीर्थ येथील चर्चेनंतर त्यांनी आपले समाधान झाल्याचे सांगितले. परंतु, राज ठाकरे पुण्यात पोहोचले तेव्हा वसंत मोरे त्यांच्या भेटीसाठी आले नव्हते. राज ठरे यांचा पुणे दौरा ठरण्यापूर्वी त्यांनी तिरुपती बालाजी मंदिराला भेट देण्याचा कार्यक्रम ठरविला होता.

तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर वसंत मोरे चार दिवसांनी पुण्यात परतले आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार तिरुपती बालाजीला गेलो होतो असं सांगत मी पक्षाशी एकनिष्ठ आहे असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.

गेली सतरा वर्ष मी अक्षय्य तृतीये दरम्यान बालाजीला जातो. मागील दोन वर्ष कोरोनामुळे जाता आले नाही. यावेळी बालाजीला जाण्यासाठी दीड महिने आधीच रिझर्वेशन केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

भोंगे काढण्यासंदर्भात माझ्या प्रभागात मी मुस्लीम बांधवांशी बोललो आहे. त्यांच्याशी समन्वय साधून हा प्रश्न मी माझ्या प्रभागात सोडवतोय. माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोलल. त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली. त्यांनी नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात सहकार्य करू असे सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.

याचवेळी वसंत मोरे यांनी पक्षांतर्गत मतभेद आहेत मात्र अजून मनभेद झालेले नाहीत. मी नाराज नाही, केवळ शांत आहे. मागच्या काही महिन्यांपासून धावपळ झाली, असे सांगत पक्षातील काही नेत्यांवर अजूनही नाराज असल्याचं त्यांनी अप्रत्यक्ष सांगितलं.