कोथरूड: विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे कोथरूड मतदारसंघ प्रचारादरम्यान सातत्याने चर्चेत राहिला होता. आज मतदानाच्या दिवशीही कोथरूडमधील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या काही काळात भाजपने मेगाभरती करून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना आपल्याकडे ओढून घेतले होते. मात्र, सोमवारी चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील मतदान केंद्रावरच मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना भाजप प्रवेशाची ऑफर देऊन टाकली. परंतु, किशोर शिंदे यांनी ही ऑफर नाकारत प्रथम मेधा कुलकर्णी व मुरली मोहोळ यांच्याकडे लक्ष द्या, असे सांगितले. चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे यांच्यात खेळीमेळीत पार पडलेल्या या संवादाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरूडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. स्थानिक भाजप संघटनेकडून याला विरोध झाला होता. आम्हाला मतदारसंघातीलच उमेदवार हवा, उपरा उमेदवार नको, अशी भूमिका अनेकांनी घेतली होती. तसेच ब्राह्मण-मराठा वादामुळे चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या होत्या. विशेष म्हणजे याठिकाणी विरोधकांनीही चंद्रकांत पाटील यांना पाडण्यासाठी मनसेच्या किशोर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे कोथरूडची लढत अत्यंत लक्षवेधी झाली आहे.
'महाराष्ट्राची इच्छा असेल तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील'
मात्र, चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी आपल्याला विजयाचा विश्वास असल्याचे म्हटले आहे. परंतु, सोमवारी त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांना दिलेली ऑफर चर्चेचा विषय ठरली आहे. मतदानाच्या दिवशी चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे हे मतदारसंघात फिरून मतदानप्रक्रियेचा आढावा घेत आहेत. योगायोगाने हे दोघेजण आज सकाळी मयूर कॉलनीमधील जोग शाळेतील मतदान केंद्रावर एकाचवेळी आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण चर्चा झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलता-बोलता शिंदे यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. शिंदे यांनीही वेळ न दवडता पाटलांची ही ऑफर धुडकावली. तसेच मेधा कुलकर्णी व मुरली मोहोळ यांच्याकडे लक्ष द्या, अशी सूचनाही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना केली.