पहिल्याच पावसात मुंबई तुंबली, पुणे बुडालं... जबाबदार कोण?

Mumbai-Pune Heavy Rain : पहिल्याच पावसात मुंबई आणि पुण्यात दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळालं... मुंबईत सखल भागात पाणी साचलं. पुण्यामध्ये तर हाहाकार पाहायला मिळाला.. मुंबई पुण्यामध्ये ही अवस्था का झालीय, यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय.

| Jun 10, 2024, 22:18 PM IST
1/6

पहिल्याच पावसात मुंबई आणि पुण्यात कशी दैना उडाली. मुंबईमध्ये अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं. मुंबईच्या परळ टीटी, हिंदमाता दादर परिसरात पहिल्याच पावसात तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. वाहनचालक आणि नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जाण्याची कसरत करावी लागली.

2/6

नेहमीपेक्षा जरा जास्त पाऊस झाला तरी हिंदमाता परिसर असा जलमय होतो. दुसरीकडे किंग्स सर्कल, अंधेरी सबवेच्या सखल भागातही पाणी साचलं.. यावरून आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय..

3/6

पहिल्या पावसाने पुण्याप्रमाणे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले. शहरांचा कारभार पाहणारे पालिका अधिकारी, यंत्रणा कुठे आहेत? हा खरा प्रश्न आहे. महापालिकांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने एजन्सी मनमानी कारभार करतायत. मुंबई, पुणे महापालिका भाजप, मिंधेंच्या मनमानीने चालवल्या जातायत. हवामान खात्याचा अंदाज असूनही पावसाची तयारी केलेली नाही.

4/6

पुण्यात गेल्या चार दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. त्यामुळं पुण्यातील धानोरी, लोहगाव, वडगाव शेरी, सिंहगड रोड, वारजे, मध्यवर्ती पेठा, डेक्कन, शिवाजीनगर असा परिसर जलमय झाला. अनेक वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरलं. नागरिकांचं मोठं नुकसान झालं.  पुणेकरांना सलग तीन दिवस या परिस्थितीचा सामना करावा लागला.. 

5/6

कमी वेळेत अति पावसामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याचं बोललं जातंय. शनिवारी  24 तासांमध्ये पुण्यात 117.1 मिमी पाऊस झालाय. तब्बल 33 वर्षांनी एका दिवसात एवढा पाऊस बरसलाय.  दरम्यान, ओढे, नाले बुडवून अतिक्रमण केल्यामुळंच रस्त्यांवर पाणी तुंबत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करताहेत.. 

6/6

मुंबईमध्ये नालेसफाईचं काम नीट झालेलं नाही, हे पहिल्याच पावसानं दाखवून दिलं. तर पुण्यात ओढे नाल्यांवरची अतिक्रमणं ही चिंतेची बाब असल्याचं स्पष्ट झालंय.