विहिरींनी तळ गाठला, घरांसमोर रिकामे हंडे... मराठवाड्यात पाणी टंचाईचं तीव्र संकट

Marathwada Water Crisis : पाणीटंचाई आणि दुष्काळ हा मराठवाड्यातील जनतेसाठी नित्यांचाच झालाय. सध्याच्या घडीला 1900 टँकर मराठवाड्याची तहान भागवताहेत. शहरांपासून ते गाव-तांड्यापर्यंत प्रत्येक जण टँकरची अगदी देवदुतासारखी वाट पाहातात.

| May 24, 2024, 21:28 PM IST
1/7

डोक्यावर रणरणतं उन्ह. समोर मोकळे हंडे. पैठणच्या टेकडी तांड्यावरच्या महिला भर उन्हात गाणं गात बसल्याचं चित्र या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. पाण्याचा टँकर कधी येईल याची वाट पाहात या महिला बसलेल्या असतात.

2/7

पैठणच्या नागरिकांना पाण्याच्या टँकरवरच विसंबून राहावं लागतंय. 8 दिवसांमधून एकदा टँकर या तांड्यावर येतो.  हे पाणी आठ दिवस कसं पुरवावं हेच कोडं इथल्या महिलांना पडलंय. आणि तीच व्यथा त्या आपल्या गाण्यातून मांडतात.

3/7

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल 700 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र अनेक गाव-खेडी अजूनही टँकरच्या प्रतीक्षेत आहेत. टेकडी तांड्यावर नळ आले मात्र या नळाला कधी पाणी आलं नाही. पाणीटंचाईमुळे गावातून स्थलांतरही वाढलंय.

4/7

मराठवाड्यातील कोणत्याही गावात गेलात तरी विहिरींनी गाठलेला तळ, घरांसमोर रिकामे हंडे आणि ड्रमच्या लागलेल्या रांगा हे चित्र पाणीटंचाईचं भीषण वास्तव दाखवणारं आहे. 

5/7

वर्षानुवर्ष या तांड्यावरील नागरिकांना पाणी प्रश्न सोडवण्याची आश्वासनं देण्यात आली. मात्र ती कोरडीच राहिलीत. आज ही इथल्या नागरिकांच्या पाचवीला दुष्काळच पुजलेला आहे. 

6/7

केवळ मराठवाडाच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दृष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळामुळे मराठवाड्याचा आर्थिक विकास देखील खुंटला आहे.

7/7

प्रत्येक निवडणुकीपूर्वी मराठवाड्यासाठी वेगवेगळ्या पॅकेजच्या घोषणा केल्या जातात, मात्र पुढे नेत्यांना याचा विसर पडतो. राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून सरकारने तात्काळ उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली जात आहे.