Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर 'या' राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शन

Biggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...  

Swapnil Ghangale | Nov 07, 2024, 17:47 PM IST
1/20

shivajimaharajtemple

सदर मंदिर याच ठिकाणी का उभारण्यात आलं? असा प्रश्न पडला असेल तर या मंदिराचा इतिहास समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जाणून घ्या नेमकं कुठे आहे हे मंदिर, पाहा मंदिरातील खास फोटो...

2/20

shivajimaharajtemple

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्यातील सर्वात मोठे नेते असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवरायांची मंदिरं उभारण्यावरुन केलेल्या विधानावर टीका केली आहे. यामुळे आता शिवाजी महाराजांची मंदिरं चर्चेत आहेत.

3/20

shivajimaharajtemple

उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीच्या सभेमध्ये महायुतीच्या सरकारच्या काळात मालवणमधील समुद्र किनाऱ्यावर शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचं मंदिर उभारु असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना अगदी सूरतमध्येही आपण शिवरायांचं मंदिर उभारु असं ठाकरे म्हणाले. सूरतमध्ये शिवरायांचं मंदिर उभारल्यास राज्यातून पळून गेलेल्या गद्दारांना तिथेही शिवराय असल्याची धाक राहील, असं विधान ठाकरेंनी भाषणात करत शिंदेंच्या पक्षावर निशाणा साधला.  

4/20

shivajimaharajtemple

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कोल्हापूरमधील महायुतीच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंब्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवा असं आव्हान केलं. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. मात्र असं असतानाच देशातील सर्वात भव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर कुठे आहे माहितीये का? याचसंदर्भात जाणून घेऊयात...

5/20

shivajimaharajtemple

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मानबिंदू अशी ज्यांची ओळख सांगितली जाते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात भव्य मंदिर त्यांची जन्मभूमि आणि कर्मभूमि असलेल्या महाराष्ट्रात नाहीये.  

6/20

shivajimaharajtemple

महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाचा सुवर्णकाळ आपल्या कर्तुत्वाने लिहिणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वात भव्य मंदिर हे आंध्र प्रदेशमध्ये आहे.  

7/20

shivajimaharajtemple

छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या ठिकाणी उभारण्यामागे एक ऐतिहासिक संदर्भ आहे. तो काय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत पण त्याआधी हे मंदिर कसं आहे ते जाणून घेऊयात.  

8/20

shivajimaharajtemple

आंध्र प्रदेश व महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे श्रीशैलम येथे शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिराची उभारणी केली आहे.   

9/20

shivajimaharajtemple

स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या ठिकाणी 2021 साली या मंदिरात जाऊन छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं होतं.  

10/20

shivajimaharajtemple

अमित शाहांनीच 12 ऑगस्ट 2021 रोजी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन या मंदिरात शिवरायांच्या मूर्तीचं दर्शन घेतानाचा फोटो पोस्ट केला होता.  

11/20

shivajimaharajtemple

श्रीशैलम येथे शिवाजी महाराज स्फूर्ती या मंदिराचं उद्घाटन 1 एप्रिल 2018 रोजी झालं. 

12/20

shivajimaharajtemple

श्रीशैलम येथे शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिरात 10 रुपयांचं तिकीट घेऊन प्रवेश दिला जातो. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आणि कर्तुत्वाला शोभणारं असं आहे. भारतामधील शिवाजी महाराजांची अगदी मोजकीच मंदिरं असून हे त्यातील सर्वात भव्य असं मंदिर आहे.  

13/20

shivajimaharajtemple

श्रीशैलम येथे शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर हे नुसतं मंदिरच नाही तर महाराष्ट्रात असलेल्या कोणत्याही मोठ्या देवस्थानाप्रमाणे मोठं आकर्षक आणि देखणं मंदिर आहे.  

14/20

shivajimaharajtemple

या मंदिरामध्ये शिवरायांची भव्य अशी ब्रॉन्झच्या धातूपासून बनवलेली सिंहासनारुढ मूर्ती आहे. 

15/20

shivajimaharajtemple

या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्यं म्हणते, मंदिरात शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र भिंतींवर लावण्यात आलं आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं वर्णन आहे.  

16/20

shivajimaharajtemple

महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींपासून ते त्यांचे शिलेदार राहिलेल्या बाजीप्रभू देशपांडेसारख्या मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाची चित्रे आणि वर्णने या मंदिराच्या भिंतीवर पाहायला मिळतात.  

17/20

shivajimaharajtemple

मंदिरात चित्ररुपात लावलेल्या या जीवचरित्रामुळे भेट देणाऱ्याला शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नसेल तर तो बाहेर पडेपर्यंत त्याला समजतो.  

18/20

shivajimaharajtemple

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शंभू महादेव आणि तुळजाभवानी मातेवर फार श्रद्धा होती.आंध्र प्रदेशातील श्रीशैलम‌् येथे दुसरे जोतिर्लिंग म्हणजेच श्री मल्लिकार्जुन मंदिर आहे. तसेच येथे 18 शक्तिपीठांपैकी श्री भ्रमरांभादेवी मातेचाही वास आहे.  

19/20

shivajimaharajtemple

त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज श्री मल्लिकार्जुनाच्या दर्शनासाठी आणि साधना करण्यासाठी सन 1647-77 दरम्यान श्रीशैलम् येथे वास्तव्यास होते. आपल्या वास्तव्याच्या काळात छत्रपतींनी बांधलेल्या ध्यान मंदिराच्या पडझडीनंतर त्या ठिकाणी श्री शिवाजी स्मारक समितीने शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर उभारले.  

20/20

shivajimaharajtemple

कुतुबशहाने केलेला सत्कार स्वीकारून शिवछत्रपती गोवळकोंड्याहून सैन्यासह दक्षिणेकडे निघाले. प्रथम श्रीशैलम‌्च्या मल्लिकार्जुन श्री भ्रमरांभादेवी मातेची त्यांनी आराधना केली. आंध्र प्रदेशातील लोक परंपरा असे मानते की, श्री भ्रमरांभा देवी मातेने शिवरायांना भवानी तलवार दिली. तसे शिल्पही या मंदिराच्या परिसरात आढळते. (फोटो सोशल मीडिया आणि ट्रीप अॅडव्हायजरवरुन साभार)