Holi Special Sweets | पुरणपोळीचा कंटाळा आलाय, या सोप्या रेसिपी होळीला नक्की करुन पाहा...

होळीला प्रामुख्याने गोड पदार्थाचा नैवेद्य म्हणून महाराष्ट्रात पुरणपोळी  केली जाते. सतत पुरणपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर होळीला घरच्या घरी या सोप्या रेसिपी नक्की करून पाहा..  

Mar 16, 2024, 14:14 PM IST

कोणताही सण किंवा समारंभ हा गोड पदार्थाशिवाय साजरा होत नाही. महाराष्ट्रात होळीच्या सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. देशभरात होळी साजरी करताना इतर राज्यात होळीला कोणते पदार्थ बनविले जातात, ते जाणून घेऊया. 

 

1/7

गुजिया

मिठाईचा प्रकार असलेला गुजिया हा पदार्थ मुळचा उत्तरप्रदेश येथील आहे. करंजीसारखा दिसणारा हा पदार्थ खास होळीला केला जातो. खवा,रवा, तूप आणि ड्रायफ्रुट्स एकत्र करून त्याचे सारण केले जाते. त्यानंतर मैदाच्या छोट्या पाऱ्यामध्ये सारण भरल्यावर ते तेलात तळले जातात. सतत पुरणपोळी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही यंदाच्या होळीसाठी घरच्या गुजिया बनवू शकता. 

2/7

थंडाई

होळीच्या दिवसात हवेतील तापमान वाढायला सुरुवात होते. त्यामुळे वाढत्या गरमीत शरीराला थंडावा मिळण्याकरीता होळीला थंडाई पिण्याची परंपरा आहे.होळी थंडाई पिण्यास अनेक जण पसंती दर्शवतात. थंडाईमध्ये असलेले नट्स, ड्रायफ्रूट्स,दूध, बडीशेप आणि बिया हे शरीराला फायदेशीर आहेत. होळीच्या दिवशी घरच्या घरी थंडाई बनवायला साधी सोपी आहे. 

3/7

रसमलाई

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रसमलाई सर्वांनाच आवडते. खास होळीसाठी तुम्ही घरच्या घरी रसमलाई करू शकता. केशर,दूध आणि ड्रायफुड्सचा समावेश असलेली रसमलाई चवीला गोड असण्यासोबतच आरोग्यवर्धक आहे. 

4/7

मालपुआ

मालपुआची रेसिपी बनवायला साधी सोपी आहे. गव्हाच्या पिठापासून तयार केलेला मालपुआमध्ये तुप,साखर.वेलची पुडचा समावेश केला जातो. चवीला गोड असणारा हा पदार्थ तुम्ही होळीसाठी घरच्या घरी सहजपणे बनवू शकता.   

5/7

नारळाच्या दुधातील शेवया

नारळाच्या रसातील शिरवळ्या किंवा नारळाच्या दुधातील शेवया असंही म्हटलं जातं. कोकणातील हा पारंपारिक पदार्थ खास सणावाराला केला जातो. कोकणात होळीला शिमगा असं म्हणतात. शिमग्याच्या उत्सवाला कोकणात नारळाच्या दुधातील शेवया बनवल्या जातात. तांदळाचं पीठ, ओलं खोबरं आणि गूळ एकत्र करून केलेल्या या शेवया चवीला गोड असतात. 

6/7

बदाम फेरनी

बदाम फेरनी हा पंजाबी प्रकार असून चवीला गोड असतो. दिवाळी,करवा चौथ आणि होळीला बदाम फेरनी बनवली जाते. बासमती तांदूळ, दूध, वेलची पावडर, केसर आणि साखर एकजीव करून जाडसर खीर तयार केली जाते.   

7/7

चमचम

बंगाली मिठाईला देशभरातच नाही तर विदेशात ही तितकीच लोकप्रियता आहे. चमचम हा बंगाली पदार्थ असून खास सणाच्या दिवशी केला जातो. नारळ, मलई, केशर, साखर , गुलकंद आणि मैदा आणि मावा एकत्र करून चमचम तयार केला जातो.