नाशिक : सातपूर भागात प्रबुद्ध नगरमध्ये प्रशांत भोसले गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेजारी राहणाऱ्याची मांजर खेळत-खेळत त्यांच्या गिरणीत शिरली. भोसले यांनी या मांजरीला तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.
पण ते मांजर तसेच ढीम्म बसून होते. काही वेळ तिथेच थांबून त्या मांजराने गिरणीत घाण केली. त्या घाणीमुळे गिऱ्हाईकांनी दिलेल्या धान्याचे पीठ पूर्णत: खराब झाले. झाल्या नुकसानीमुळे संतप्त झालेल्या गिरणी मालकांनी मांजरीच्या मालकाशी वाद घातला.
एका मांजरीने केलेल्या या घाणीमुळे निर्माण झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. तर, काही महिन्यांनी कोर्टात. न्यायालयाच्या निर्णयानुसार सातपूर पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला. या घटनेला चार वर्ष झाली. परंतु, दरम्यानच्या काळात मांजरीच्या मालकाने गिरणी मालक प्रशांत भोसले यांच्या विरोधात पोस्को, चोरी, विनयभंग असे विविध गुन्हे दाखल केले.
भोसले यांच्याविरोधात हे असे भयानक गुन्हे दाखल झाले. एका पाळीव मांजराची तक्रार करून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेलया भोसले यांच्याविरोधात खोटे गुन्हे नोंदविले गेले आणि त्यांनाच थेट तडीपार करण्यात आलंय.
एका मांजरीमुळे झालेल्या या वादात तक्रारदारालाच तडीपारीची शिक्षा झालीय.. या घटनेची नाशिक परिसरात जोरदार चर्चा होत असून वाद विकोपाला गेल्यास त्यातून काय काय होऊ शकतं हेच या घटनेतून समोर आलंय.